विरारमध्ये इमारत कोसळली : 15 जणांचा मृत्यू

Building collapses in Virar : 15 people killed विरार, मुंंबई (28 ऑगस्ट 2025) : वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील मौजे नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील भाग कोसळून इमारतीच्या मातीचा ढिगारा शेजारच्या चाळीवरही कोसळल्याने रहिवासी मलब्याखाली दबले गेले. या घटनेत सुमारे 15 नागरिकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 24 जणांना इमारतीच्या ढिगार्‍याखालून बाहेर काढण्यात यश आले असून ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.

30 तासांपासून बचावकार्य सुरु असून एनडीआरएफच्या 5 व्या बटालियनच्या दोन तुकड्या, वसई-विरार महानगरपालिकेची तुकडी आणि स्थानिक पोलिस रात्रंदिवस मदत आणि बचाव कार्यात गुंतलेले आहेत.

विरारच्या विजय नगर येथील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा काही भाग कोसळला. या इमारतीच्या ढिगार्‍यात अनेक कुटुंब गाडली गेली. या अपार्टमेंटमध्ये 50 घरं आहेत. त्यापैकी 12 घरं कोसळली. तसेच इमारतीचा मलबा शेजारील चाळीवर कोसळल्याने चाळ उद्ध्वस्त झाली आणि मोठी जीवितहानी झाली. या दुर्घटनेनंतर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं. वसई-विरार महानगरपालिका अग्निशमन दल व एनडीआरएफ घटनास्थळी तात्काळ दाखल झालं होतं.