दोन निष्पाप मराठा बांधव गेले ; आतातरी समाजाला आरक्षण द्या : मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange-Patil मुंबई (28 ऑगस्ट 2025) : मराठा समाज आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत दोन मराठ्यांचे बळी गेले असून आतातरी फडणवीस साहेब आरक्षण द्या, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हणाले आहेत.

मराठा समाज आरक्षणासाठी बुधवारी अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले. गुरुवारी सकाळी ते शिवनेरीवर पोहोचले. त्यातच जुन्नरजवळ एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सतीश देशमुख असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे.

मनोज जरांगे पाटील यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, आमचा देशमुख नावाचा बांधव प्रवासात असताना त्यांचा दम छाटला आणि त्यांना अटॅक आला. मी याबाबत अजूनही माहिती घेत आहे. परंतु ही घटना अत्यंत दुःखद आहे. याला जबाबदार फडणवीस साहेब आहेत. तुम्ही आता आम्हाला आरक्षण दिले तर आमचे बळी जाणार नाहीत. आमचे आणखी दोन बळी घेतले आहेत. लातूरला परवाच्या दिवशी अशीच घटना घडली आहे. आज देखील अशीच घटना घडली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

जरांगे म्हणाले की, माझी शिवनेरीवरची ही शेवटची भेट असू शकते. मी माझ्या समाजाच्या पोरं बाळांसाठी लढत आहे. त्यांच्या वेदना खूप अवघड आहेत. त्यांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे. म्हणून आम्ही इकडे आंदोलनाला आलेलो आहोत. ते सगळे पाठीमागून बाजू सांभाळत आहेत. वेळ पडली तर त्यांनीदेखील गाड्या लावून ठेवल्या आहेत. सर्व धान्य भरून ठेवलेले आहे. ते देखील ताकदीने लढायला तयार आहेत त्यामुळे आपली भूमिका विजय मिळवून देणे हीच असते. पण, सरकार आडमुठे आहे. मुद्दाम मराठा विरोधी काम करत आहे. पुढचं काही सांगता येत नाही. पण, मी सावध आहे. जिंकणार आहे, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.