राहुल गायकवाड यांच्याकडे जळगाव गुन्हे शाखेची धुरा ; संदीप पाटील नियंत्रण कक्षात

Rahul Gaikwad takes charge of Jalgaon Crime Branch; Sandeep Patil in control room जळगाव (29 ऑगस्ट 2025) : जळगाव पोलिस दलासाठी शुक्रवार, 29 ऑगस्ट हा दिवस धक्कादायक ठरला. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी डीपीडीसी बैठकीत जळगाव पोलिस दलातील अत्यंत महत्त्वाची खुर्ची असलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांवरच गंभीर आरोप केल्यानंतर पोलिस यंत्रणेत पुरती खळबळ उडाली. या आरोपाची जिल्हा पोलिस अधीक्षकांनी गांभीर्याने दखल घेत तातडीने संदीप भटू पाटील यांना एलसीबीच्या पदावरून हटवत नियंत्रण कक्षात जमा केले व तूर्त एलसीबीचच्या प्रभारीपदी जिवाशा शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्याकडे पदाची धुरा सोपवली.

जळगाव पोलिस दलात खरं तर चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आली आहे. सदरक्षणाय खलनिग्रणाय हे ब्रीदवाक्य असलेल्या पोलिस दलातील अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप होत असतील तर पोलिस दलात कुठेतरी सुधारणा करण्याची वेळ आल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

आमदार मंगेश चव्हाणांचा गंभीर आरोप अन् पोलिस दलात खळबळ
शुक्रवारी जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगव एलसीबी निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर गंभीर आरोप करीत खळबळ उडवून दिली. या आरोपाची जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दखल घेत सायंकाळी संदीप पाटील यांची एलसीबीच्या प्रमुख पदावरून उचलबांगडी करून त्यांना नियंत्रण कक्षात जमा केले तर जिल्हा विशेष शाखेचे प्रभारी राहुल गायकवाड यांच्याकडे तूर्त एलसीबीची धूरा सोपवण्यात आली.