धुळ्यातील वीज कंपनीचा तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात

A technician of an electricity company in Dhule is caught by ACB धुळे (30 ऑगस्ट 2025) : नवीन वीज मीटर बसवण्यासाठी शासकीय शुल्क भरूनही दिड हजारांची लाच मागणार्‍या धुळ्यातील चितोड येथील महाराष्ट्र राज्य विद्युत चा वितरण कंपनीच्या तंत्रज्ञाला धुळे एसीबीचे डॅशिंग पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वातील पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईने धुळे जिल्ह्यातील लाचखोर पुरते हादरले आहेत.

गणेश पितांबर बडगुजर (30, रा.चितोड, ता.धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. शुक्रवार, 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदाराने त्यांच्या पत्नीच्या नावे चितोड, ता.धुळे येथे वीज कनेक्शन मिळण्यासाठी अर्ज केला होता. 9 जून 2025 ऑनलाईन अर्ज करून एक हजार 620 रुपये भरण्यात आले व ग्रामीण उपविभाग क्रमांक एकच्या धुळे कार्यालयातील सहाय्यक अभियंता वसीम तडवी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आरोपी बडगुजर यांना नवीन वीज मीटर लावण्याचे सूचित केले मात्र आरोपीने दिड हजारांची लाच मागितल्याने तक्रार दिल्यानंतर सापळा यशस्वी करण्यात आला.

वीज कंपनीचा कंत्राटी तंत्रज्ञ असलेल्या बडगुजर याने लाच मागितल्याने गुरुवार, 28 रोजी धुळे एसीबीकडे तक्रार देण्यात आली व लाच पडताळणी करून शुक्रवारी सापळा रचण्यात आला. चितोड गावात आरोपीने लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली.

धुळे एसीबी पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वातील पोलिस निरीक्षक यशवंत बोरसे व सहकार्‍यांनी हा सापळा यशस्वी केला.