भुसावळात गणपती विवाह सोहळ्यासह आरास पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

उत्सवाचे 19 वे वर्ष ; पहिल्या दिवसापासून आराससाठी गर्दी

भुसावळ (31 ऑगस्ट 2025) : शहरातील जय गणेश फाउंडेशनच्या नवसाचा गणपती सांस्कृतिक उत्सव सोहळा यंदा अलौकिक ठरला आहे. पाच हजार चौरस फुटांच्या भव्य मंडपात गणपती विवाह सोहळा ही चलचित्र आरास साकारण्यात येत आहे. यावर्षी गणेशोत्सवात पहिल्या दिवसापासून ही आरास भुसावळकरांना वर्‍हाडी म्हणून अनुभवता येईल.

आरास उभारणी पूर्ण
भुसावळच्या सुरभी नगरातील जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, फाउंडेशन अध्यक्ष राजेंद्र यावलकर, समन्वयक गणेश फेगडे यांच्या मार्गदर्शनात ही आरास उभारणी करण्यात आली. महाराष्ट्र, मध्यप्रदेश येथील कारागीरांनी चलचित्र आरास साकारली असून चारही बाजूने ती पाहता येत आहे.

पौराणिक कथेवर आधारित आरास
गणपती विवाह सोहळ्याची ही चलचित्र आरास पौराणिक कथेवर आधारित आहे. ब्रह्मा, विष्णू, लक्ष्मी, शिव, पार्वती, सरस्वती, कार्तिकेय, अग्निदेव, कुबेर देवता, वशिष्ठ, विश्वमित्रा, कश्यप, भारद्वाज, चंद्रदेव, सूर्यदेव, इंद्रदेव, नारदमुनी, रिद्धी सिद्धीचे वडील भगवान विश्वकर्मा यांच्या मूर्ती या आरासीत असतील. साक्षात गणपतीच्या विवाह सोहळ्यात वर्‍हाडी म्हणून हजेरी लावण्याची संधी भाविकांना मिळाली आहे.

उत्सुकता पोहोचली शिगेला
जय गणेश फाउंडेशनची आरास दरवर्षी हटके व नवा संदेश देणारी असते त्यामुळे इथल्या गणेशभक्तांना प्रचंड उत्सुकता असते. सोमवारी गणपती विवाह सोहळा चलचित्र आरासचा टिझर लाँच करण्यात आला. पुणे, मुंबईतील गणेशोत्सवाच्या धर्तीवर यंदाच्या उत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे.

आतापर्यंतच्या मोठ्या आरास
नवसाचा गणपती मंडळाने गेल्या 19 वर्षात मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कोलकाता, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र येथील कारागीर बोलावून विलोभनीय आरास साकारल्या आहेत. त्यात तिरुपती बालाजी, सोरटी सोमनाथ, अक्षरधाम, बारा ज्योतिर्लिंग, जेजुरी, गजानन महाराज मंदिर, आदियोगी मंदिर यांच्या प्रतिकृती यांचा समावेश आहे. माझे माता पिता माझे विश्व, शिवशक्ती ब्रह्मांड शक्ती या आरासला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता, अशी माहिती फाउंडेशनने दिली.