जळगावात गुटख्याचा 13 लाखांचा साठा जप्त

Food and Drug Administration on active mode : Gutkha stock worth Rs 13 lakh seized in Jalgaon जळगाव (31 ऑगस्ट 2025) : शहरासह जिल्ह्यात खुलेआमपणे व बिनदिक्कमपणे मिळणार्‍या गुटख्यावर जळगावच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने अखेर कारवाई केली आहे. 12 लाख 55 हजार 820 रुपयांचा गुटखा व चार लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आल्यानंतर गुटखा विक्रेत्यांना धक्का बसला आहे. ही कारवाई 29 ऑगस्ट रोजी कोंबडी बाजारजवळ करण्यात आली. या प्रकरणी बिहार व नशिराबाद येथील दोन जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात मिळणार्‍या खुलेआमपणे विक्री होणार्‍या ठोक विक्रेत्यांसह पानटपरी चालक व किराणा विक्रेत्यांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न सुज्ञ जनता उपस्थित करीत आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरातून एका वाहनामधून गुटखा नेला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच शहर पोलिसांनी सापळा रचला. मालवाहू वाहन कोंडी बाजार परिसरात अडविले असता त्यात वेगवेगळ्या प्रकारचा प्रतिबंधीत पानमसाला, सुगंधित तंबाखू असा एकूण 12 लाख 55 हजार 820 रुपयांचा साठा तसेच चार लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण 16 लाख 55 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंके यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पप्पूकुमार शिवदुलार सहनी (27, रा. गंगासारा, बिहार) व सुरेशकुमार कुंदन सहानी (27, रा. नशिराबाद, ता. जळगाव) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.