भुसावळातील बियाणी बंधूंची चार कोटीत फसवणूक : शेतजमिनीची केली परस्पर विक्री

Bhusawal businessman Manoj Biyani cheated of Rs 4 crores in purchase of agricultural land भुसावळ (1 सप्टेंबर 2025) : शेतजमिनीत गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल, असे सांगून भुसावळातील प्रसिद्ध उद्योजक मनोज बियाणी व विनोद बन्सीलाल बियाणी यांची मध्यप्रदेशातील नऊ आरोपींनी सुमारे चार कोटींमध्ये फसवणूक केली. आरोपींनी जमीन खरेदी करून देण्यासाठी नोटरी करून देत नंतर या जमिनीची परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आरोपींविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याने हा गुन्हा जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होण्याची शक्यता आहे.

असे आहे फसवणूक प्रकरण
भुसावळातील प्रसिद्ध उद्योजक मनोज बियाणी व त्यांचे बंधू विनोद बन्सीलाल बियाणी (भुसावळ) यांना आरोपी मुकेश कुमेरसिंग मेवाडा (फंदा, ता.हुजूर, भोपाळ) यांनी जमिनीत गुंतवणूक केल्यास त्यातून मोठा लाभ होईल, असे आमिष दाखवले. जानेवारी 2024 ते 13 मे 2025 दरम्यान आरोपींनी शहरातील ममता पॅलेस, प्रोफेसर कॉलनी, भुसावळ येथे 95 लाख रुपये आरटीजीएसने तसेच तीन कोटी एक लाख रुपये रोखीने स्वीकारले. आरोपींनी जमिनीचा व्यवहार होण्यासाठी व विश्वास बसण्यासाठी सुरूवातीला न ोटरी करून दिली मात्र प्रत्यक्षात या जमिनीची विक्री झाल्याचे समोर आल्यानंतर फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली.

शेतजमीन दाखवून परस्पर दुसर्‍याला विकली
आरोपींनी हताईखेडी, ता.हुजूर, जि.भोपाळमधील खसरा क्रमांक 108/1 क्षेत्र 1.03580 हेक्टर, क्षेत्र 2.56 एकर ही जमीन एक कोटी 33 लाख 50 हजारात तर जमनी सिहोर, ता.सिहोर येथील शेतजमीन 310/02/4 क्षेत्र 1.926 हेक्टर क्षेत्र 4.75 एकर किंमती दोन कोटी 62 लाख 50 हजार रुपये अशी निश्चित करून तीन कोटी 96 लाखांची नोटरी सौदा पावती केली मात्र मुदतीत जमिनीची खरेदी करून न देता तिची परस्पर विक्री केली.

या आरोपींविरोधात गुन्हा
विनोद बन्सीलाल बियाणी (भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून आरोपी मुकेश कुमेरसिंग मेवाडा (फंदा, ता.हुजूर, भोपाळ), मुकेश दलपतसिंग ठाकूर (अंगणवाडीजवळ, सिहोरना, बैरागड हुजूर, भोपाळ), रामेश्वर दलपतसिंग ठाकूर (ग्रामजमनी, ता.जि.सिहोर), रंजीत कालूराम राठोड (कोडी मोहल्ला, गंजसिहोर, अष्टसिहोर), दिनेश पटेल राहुजूर (मेवारा ग्रामसरपंच, भोपाळ), हिमांशू रंजीत राठोर (कोडी मोहल्ला, गंज सिहोर), हरीश प्रेमनारायण त्यागी (सिहोर), मिश्रा रामरतन शाक्य (अभिरूची परिसर, जुने सुभाष नगर, भोपाल, मध्यप्रदेश) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राहुल वाघ करीत आहेत.