60 troublemakers from Bhusawal and other talukas under curfew during Ganeshotsav: Provincial authorities order भुसावळ (1 सप्टेंबर 2025) : विघ्नहर्त्याचा गणेशोत्सव शांततेत व सुव्यवस्थेत पार पडण्यासाठी नूतन पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यांनी कठोर पावले उचलली आहेत. गावीत यांच्या नेतृत्वात पोलिसांनी उपद्रवींच्या शहरबंदीचे प्रस्ताव सादर केल्यानंतर प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार एकूण 60 उपद्रवींना शहरबंदी करण्यात आली. या निर्णयानंतर उपद्रवींच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

या हद्दीत उपद्रवींना शहरबंदी
भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 45 उपद्रवींना 3 ते 8 सप्टेंबर या कालावधीत शहरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली तर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 15 उपद्रवींना 5 ते 8 सप्टेंबर दरम्यान शहरबंदी करण्यात आली.
भुसावळचे डीवायएसपी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ व शहर निरीक्षक उद्धव डमाळे यांनी याबाबतचे प्रस्ताव प्रांत अधिकारी कार्यालयात दाखल केले. त्यावर निर्णय देत प्रांत अधिकार्यांनी शहरबंदीचे आदेश काढले.
दरवर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अशा प्रकारची कारवाई केली जाते. यामुळे अनावश्यक गर्दी, वादविवाद व उपद्रव टाळता येतो. नागरिकांनी उत्सवाच्या काळात प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.