जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेशात दुचाकींची चोरी करणारे अट्टल चोरटे जाळ्यात

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची मोठी कारवाई : चोरीच्या 16 दुचाकी जप्त

Persistent thieves who stole two-wheelers in Madhya Pradesh including Jalgaon district caught in the net भुसावळ (1 सप्टेंबर 2025) : जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांसह नजीकच्या मध्यप्रदेशातून तब्बल 16 दुचाकी चोरी करणार्‍या अट्टल चोरट्यांच्या भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींविरोधात मध्यप्रदेशात एक गुन्हा दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काल्या उर्फ विक्रम केसरसिंग बारेला (20, गारण्या, ता.झिरण्या, जि.खरगोन, मध्यप्रदेश) व राहुल रितेश चव्हाण (18, जयभीम मोहल्ला, शाहपूर, जि.बर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

सीसीटीव्हीद्वारे आरोपी निष्पन्न
भुसावळातील किराणा व्यावसायीक अझरुद्दीन नियाजुद्दीन शेख (38, गौसिया नगर, भुसावळ) यांच्या मालकिची दुचाकी (एम.एच.19 बी.व्ही.5886) ही 16 जुलै 2025 रोजी चोरीला गेल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होता. पोलिसांकडून तपास सुरू असताना सीसीटीव्हीत संशयीत निष्पन्न झाल्यानंतर त्यांचा शोध सुरू करण्यात आला व आरोपींना मध्यप्रदेशातून 23 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. पोलिस कोठडीदरम्यान आरोपींनी भुसावळसह नजीकच्या जामनेर, सावदा, फैजपूर तसेच जिल्ह्यातील काही भागातून तसेच मध्यप्रदेशातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिल्याने एकूण आठ लाख 32 हजार रुपये किंमतीच्या 16 दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपींची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत, भुसावळ बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नेरकर, नाईक सोपान पाटील, कॉन्स्टेबल योगेश माळी, कॉन्स्टेबल भूषण चौधरी, कॉन्स्टेबल प्रशांत सोनार, कॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील, कॉन्स्टेबल अमर अढाळे, हवालदार किरण धनगर, हवालदार रवींद्र भावसार, कॉन्स्टेबल सचिन चौधरी, कॉन्स्टेबल जावेद शहा, कॉन्स्टेबल हर्षल महाजन, कॉन्स्टेबल योगेश महाजन आदींच्या पथकाने केली.