भुसावळात बेशिस्त वाहनधारकांवर वाहतूक शाखेची कारवाई

Traffic branch takes action against unruly vehicle owners in Bhusawal भुसावळ (1 सप्टेंबर 2025) : शहरातील वाढत्या बेशिस्त वाहतुकीवर आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे शुक्रवारी संध्याकाळी कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. जामनेर रोडवरील बाजारपेठ पोलीस ठाण्यापासून नहाटा चौफुलीपर्यंत उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर ही कारवाई करण्यात आली. यात 18 दुचाकी, तीन रिक्षा, 7 हातगाड्या आणि 2 चारचाकी वाहनांचा समावेश असून सर्व वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईने खळबळ
वाहनधारकांकडून रस्त्याच्या कडेने किंवा थेट रस्त्यात वाहने उभी करून दिली जात असल्याने अन्य वाहनधारक व पादचार्‍यांना मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. शहर वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक उमेश महाले यांनी कर्मचारी सोबत घेऊन जामनेर रोडवर मोहिम उघडली असून कारवाईदरम्यान केवळ मोटारसायकल, रिक्षा वा कारच नव्हे तर रस्त्यावर थेट व्यवसाय करणार्‍या हातगाडीधारकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामुळे शहरातील वाहनधारक व व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली.

दररोज होणार कारवाई
विशेष म्हणजे ही कारवाई एकदाच न थांबता दररोज सुरू राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे.
वाहतूक शाखेच्या या कारवाईनंतर रस्ते मोकळे मोकळे झाले. ही नियमित कारवाई सुरू राहिल्यास नागरिकांमध्ये नियमपालनाची जाणीव निर्माण होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असे शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक उमेश महाले यांनी सांगितले.