भुसावळ (1 सप्टेंबर 2025) : जय गणेश फाउंडेशन गेल्या 18 वर्षांपासून अठरा इंचाची शाडू मातीची गणेशमूर्ती मूर्तीची स्थापना करते आहे. मूर्तीपेक्षा विचारांची उंची वाढणं गरजेचे आहे. अगदी या निकोप विचारधारेतून फाउंडेशन दरवर्षी जी सांस्कृतिक कार्यक्रमाची आखणी करते हे भुसावळचे सांस्कृतिक वैभव आहे. अशा शब्दांत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी फाउंडेशनची प्रशंसा केली.

सपत्नीक दिली भेट
गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी अर्थात रविवारी त्यांनी भुसावळ येथे सुरभी नगरातील जय गणेश फाउंडेशनच्या नवसाचा गणपती येथे सायंकाळी सपत्नीक भेट दिली. अलौकिक गणपती विवाह सोहळ्याची चलचित्र आरास पाहून ते भारावले. पुणे, मुंबई, नाशिक अशा महानगरात जसे कसब पणाला लावून आरास साकारलेल्या असतात त्याच धर्तीवर भुसावळात जय गणेश फाउंडेशन प्रयत्न करते याचा आनंद आहे. दहा दिवस बाल गट, महिला आणि ज्येष्ठांसाठी जे कार्यक्रम घेतले जाताहेत ते पथदर्शी आहेत. त्यासाठी धडपड करणारे माजी नगराध्यक्ष व फाउंडेशनचे संस्थापक उमेश नेमाडे यांच्या कल्पकतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे अशा शब्दांत त्यांनी संपूर्ण टीमचे कौतुक केले. फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र यावलकर, समन्वयक गणेश फेगडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन जिल्हाधिकारी यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.
चित्ररंगवा स्पर्धेत 150 विद्यार्थी
बालकांना रंग, रेषा, आकृती, कुंचला आणि त्याचे फटकारे यांची माहिती व्हावी म्हणून चित्ररंगवा स्पर्धा घेण्यात आली. त्यात 150 विद्यार्थी सहभागी झाले. रंगकर्मी व कलाशिक्षक संजय चव्हाण व त्यांच्या टिमने परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. लहान व मोठा अशा दोन गटात ही स्पर्धा झाली. रांगोळी स्पर्धाही घेण्यात आली. महिला स्पर्धकांनी विविध प्रकारच्या आकर्षक व प्रबोधनपर विषय घेऊन रांगोळ्या रेखाटल्या.
उद्या गर्दी दुपटीने वाढणार
गणपती विवाह सोहळ्याची आरास पाहण्यासाठी रविवारी पाचव्या दिवशी गणेशभक्तांची गर्दी झाली होती. मंगळवारी उत्सवाचा सातवा दिवस आहे. दरवर्षी सातव्या दिवशी दुप्पट गर्दी होती. पावसाने पाच दिवसांनंतर रविवारी उसंत दिल्याने आता बुधवारी जास्त भाविक आरास पाहण्यासाठी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर फाउंडेशनने दर्शन रांगेच्या ठिकाणी 25 स्वयंसेवक तैनात ठेवण्याचे नियोजन केले आहे. अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश नेमाडे यांनी दिली.
आस्था परिवाराचे सुंदरकांड
गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी म्हणजेच बुधवारी आस्था परिवार सुंदरकांड सादर करणार आहे. लय, ताल, सुरांचा त्रिवेणी संगम याची अनुभूती गणेशभक्तांना येईल. सायंकाळी सात वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यांनंतर पुढील तीन दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. दहा दिवस होणार्या विविध प्रकारच्या स्पर्धांतील विजेत्यांना शेवटच्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी तुषार झांबरे, तुकाराम आटाळे,राहुल भावसेकर, प्रविण पाटील, सुमित यावलकर, हर्षल वानखेडे, रामा चौधरी, नचिकेत यावलकर, विशाल आहुजा, रविंद्र पाटील,रवी जोनवाल,कृष्णा मराठे, अरविंद बोंडे, ज्ञानदेव ढाके, प्रभाकर चौधरी आदी पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.