जोडीदार निवडताना आई-वडिलांना विश्वासात न घेतल्यास निर्णय आत्मघातकी ठरू शकतो !

जय गणेश फाउंडेशनच्या गणेशोत्सवात नाटिकेतून बोलका संदेश

भुसावळ (2 सप्टेंबर 2025) : शहरातील जय गणेश फाउंडेशनतर्फे नवसाचा गणपती उत्सव सुरू आहे. त्यात दहा दिवस सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत. सोमवारी रात्री साकरीच्या जनता हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ‘पळून गेलेल्या मुलीची कथा’ ही हृदयस्1पर्शी व समाज वास्तव मांडणारी नाटिका सादर केली. ‘जोडीदार निवडताना जन्मदात्या माय-बापाला विश्वासात घ्या. अन्यथा, भावनेच्या भरात घेतलेला निर्णय आत्मघातकी ठर शकतो’, असा संदेश या नाटिकेतून देण्यात आला. नाटिकेतील अनेक प्रसंगांनी नाट्यरसिक व उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले.

प्रत्येक प्रसंग हृदयाचे तळघर जागवणारा
फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, अध्यक्ष राजेंद्र यावलकर, सचिव तुकाराम आटाळे, समन्वयक गणेश फेगडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. नाटिकेचे लेखन व दिग्दर्शन यामिनी फेगडे यांनी केले. मुलीच्या शिक्षणासाठी वडील शेती विकून टाकतात. लग्नाची बोलणी, साखरपुडा होतो मात्र लग्नाच्या दिवशी मुलगी चिठ्ठी लिहून पळून जाते. महिला टोमणे मारतात. ते असह्य झाल्याने आईचा हृदयविकाराने मृत्यू होतो. लेकीने जो जोडीदार निवडलेला असतो तो बेरोजगार असतो. तिच्या पगारावर तो व्यसने करतो. तिला मारझोड करतो. ती माहेरी परत येते. वडील स्वीकारत नाहीत. तुझ्यामुळे तुझी आई या जगातून कायमची निघून गेली असं सांगतात. ते ऐकल्यावर तिला काय करावे काही कळत नाही अशी या नाटिकेची पटकथा आहे. प्रत्येक प्रसंग हा थेट हृदयाचं तळघर जागवणारा आहे. त्यामुळे उपस्थित रसिक खिळून होते.

नाट्याभिनय कसदार, नेपथ्य आटोपशीर
नाटिकेत सहभागी जवळपास दहा ते बारा मुलीच होत्या. पुरुष पात्रही त्यांनी हुबेहूब रेखाटले होते. प्रत्येकीचा अभिनय कसदार होता. खुल्या रंगमंचावर आटोपशीर नेपथ्य व तोकडी प्रकाशयोजना, गावगाडा रेखाटणारी रंगभूषा हेच या नाटिकेचे वैशिष्ट्ये होते. अस्खलित संवादाने ही नाटिका उत्तरोत्तर रंगत गेली. याच बालरंगकर्मीतून भविष्यात मोठे कलाकार घडतील आणि ते भुसावळचा लौकिक आणखी वाढवतील असा विश्वास माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी व्यक्त केला.

होम मिनिस्टर स्पर्धा रंगली
गणेशोत्सवात होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात आली. त्यात 30 महिला सहभागी झाल्या. त्यात कल्याणी पंकज अत्रावळकर या विजेत्या ठरल्या. त्यांना काटदरे फूड अँड स्पायसेस कंपनीचे प्रतिनिधी प्रशांत मनोहर देशमुख यांच्या हस्ते 5000 रुपयांची पैठणी देण्यात आली. संजीवनी यावलकर, संजय यावलकर, माजी नगरसेविका सुषमा नेमाडे परीक्षक होत्या. सूत्रसंचालन हर्षल वानखेडे यांनी केले. साक्षी चौधरी, ओम चौधरी, लोकेश चौधरी, पार्थ लोनडे, नचिकेत यावलकर, राहूल भावसेकर, तुषार झांबरे यांनी परिश्रम घेतले.