जळगावात तरुणावर धारदार शस्त्राने वार

Youth attacked with sharp weapon in Jalgaon जळगाव (2 सप्टेंबर 2025)  : अंडापावच्या गाडीवर वाद झाल्यामुळे दोन ते तीन जणांनी रणजीतसिंग जीवनसिंग जुन्नी (32, रा.आत्महत्या कॉलनी, जळगाव) याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या भांडणात त्या गाडीवर अंडापाव खात असलेला प्रियांशू विद्यासागर सिंग (20, रा.जळगाव) हा तरुणदेखील गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी रात्री आठ वाजता गिरणा टाकी परिसरात घडली. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

काय घडले जळगावात ?
शहरातील रामानंद नगरजवळील गिरणा टाकी परिसरात असलेल्या एका अंडापावच्या गाडीवर रविवारी रात्रीच्या सुमारास रणजीतसिंग जुन्नी हा अंडापाव खाण्याकरीता गेला होता. त्याठिकाणी त्याचे टेबलावर बसण्यावरुन काही तरुणांसोबत वाद झाले. त्यांच्यातील वाद वाढतच गेल्याने तेथे असलेल्या दोघांनी जीवनसिंग जून्नी यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये त्याच्या डोक्याच्या डाव्या बाजूला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे.

पोलिसांनी घेतली धाव
हा वाद सुरू असतांना त्या गाडीवर अंडापाव खात असलेला प्रियांशू सिंग याच्यावर देखील त्या हल्लेखोरांनी वार केले. यामध्ये त्या मांडीला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी जीवनसिंग जून्नी व प्रियांशू सिंग यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहे.