भुसावळ पालिका निवडणूक : 30 सप्टेंबरपर्यंत अंतिम प्रभाग रचनेला मिळणार मंजुरी !

पालिकेच्या प्रारुप रचनेच्या दाखल हरकतींवर सुनावणी : भुसावळ प्रांताधिकारी विभागीय आयुक्तांना देणार अभिप्राय

Bhusawal Municipal Election :  Hearing on objections filed against the draft structure of the municipality भुसावळ (3 सप्टेंबर 2025) : पालिका निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग प्रसिध्द होऊन यावर 31 हरकती प्रशासनाकडे दाखल झाल्यानंतर मंगळवारी प्रांत कार्यालयातील सुनावणीदरम्यान हरकतींवर चर्चा झाली. आता प्रांताधिकारी आपला अभिप्राय विभागीय आयुक्तांना कळवतील तर 30 सप्टेंबरपर्यंत अंतिम प्रभाग रचनेला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

काय घडले प्रांत कार्यालयात ?
पालिका प्रशासनाकडे अखेरच्या मुदतीपर्यंत 31 हरकती दाखल आहेत. त्यात नैसर्गिक सीमांचे उल्लंघन, प्रभागांचे विभाजन, लोकसंख्येत असमानता आदी विषयांवर अधिक हरकती आहेत. या हरकतींवर मंगळवारी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे सुनावणी घेण्यात आली.

या सुनावणीनंतर प्रांताधिकारी पाटील आपला अभिप्राय 9 ते 11 सप्टेंबर विभागीय आयुक्तांकडे सादर करणार आहेत. यानंतर 26 ते 30 सप्टेंबरच्या काळात राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपालीकेची अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिध्द केली जाणार आहे.

अनुपस्थित राहणार्‍यांना संधी नाही
पालिकेच्या प्रभाग रचनेवर शहरातून 31 हरकती दाखल झाल्या होत्या. लिखीत स्वरुपात हरकत घेणार्‍यांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले होते. यापैकी तील जण अनुपस्थित होते. अनुपस्थित असणार्‍यांना यापुढील काळात आपले म्हणणे मांडण्यासाठी पुन्हा संधी मिळणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.