Shalarth ID scam ; Only four employees were entrusted with checking 456 files नागपूर (3 सप्टेंबर 2025) : नागपूर जिल्ह्यातील शालार्थ आयडी घोटाळ्यात 456 फायली तपासण्याची जवाबदारी अवघ्या चौघा कर्मचार्यांवर आल्याचे वृत्त आहे. गणेश विसर्जनानंतर बोगस शिक्षकांवर कारवाईची दाट शक्यता असून दीडशे अर्जांची तपासणी आणि जबाब घेणे सुरू सध्या सुरू आहे.

शालार्थ आयडी घोटाळ्यात बनावट नियुक्तीपत्रावर झालेल्या 680 शिक्षकांवर गणेश विसर्जनानंतर कारवाई होणार आहे. या शिक्षकांचा नियमित पगार निघत होता. शासनाची लाखो रुपयांची फसवणूक झाली. पगार म्हणून देण्यात आलेले हे पैसे वसूल करण्यासाठी भा.दं.वि. कलम 107 अंतर्गत वसुलीसाठी प्रक्रिया सुरू करण्यासाठी न्यायालयात परवानगीसाठी अर्ज करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दिवंगत शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्या स्वाक्षरीने नेमके किती बनावट नियुक्ती आदेश निघाले याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाला पत्र देऊन मागितली आहे. यासाठी स्मरणपत्रही दिले आहे. या संबंधीचा सर्व रेकॉर्ड पुणे आयुक्त कार्यालयात पाठवण्यात आल्याचे उपसंचालक कार्यालयाचे म्हणणे आहे.
या प्रकरणी आतापर्यंत दोन संगणक, वेतन पथक अधीक्षक नीलेश वाघमारे यांचा एक लॅपटॉप, मंघाम यांचा मोबाईल व वायफाय डिव्हाइस जप्त करण्यात आले आहे. आरोपपत्र सादर झाल्याने आरोपी जामिनास अर्ज देत आहेत.
यापूर्वी मनुष्यबळ कमतरतेमुळे फायली तपासण्यास वेळ लागल्याने अहवाल वेळेत सादर होऊ शकला नव्हता. प्राथमिक शिक्षण विभागातील 1055 फायली होत्या. त्यातील 24 फायली तपासायच्या आहेत. माध्यमिक शिक्षण विभागातील 1036 पैकी 280 तपासायच्या राहिल्या होत्या. त्यापैकी 80 तपासल्या असून 200 बाकी असतानाच आणखी 232 फायली आल्या. त्यामुळे आता माध्यमिक शिक्षण विभागातील एकूण 432 व प्राथमिकच्या 24 अशा एकूण 456 फायली केवळ चार कर्मचार्यांच्या मदतीने तपासायच्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.