जळगाव (3 सप्टेंबर 2025) : महालक्ष्मीचा कार्यक्रम पाहून घरी परतणार्या एका महिलेच्या गळ्यातून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी सोन्याची पोत धूम स्टाईल लांबवली. ही घटना सोमवार, 1 सप्टेंबर रोजी रात्री सव्वाआठ वाजता नंदनवन कॉलनीत घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले महिलसोबत ?
नंदनवन कॉलनीतील उमा सतीश लाठी (58) या सोमवार, 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी आपली जाऊ आणि मुलीसोबत शेजारी राहणार्या केदार देशपांडे यांच्या घरी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन झाल्यानंतर त्या गल्लीत इतर महिलांसोबत बोलत उभ्या होत्या. त्यानंतर घरी परतत असताना अचानक एका दुचाकीवर दोन अज्ञात इसम त्यांच्या जवळ आले. दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने उमा लाठी यांच्या गळ्यातील अंदाजे 15 ग्रॅम वजनाची आणि 60 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून घेतली आणि दोन्ही चोरटे घटनास्थळावरून पळून गेले.
हा प्रकार घडताच उमा लाठी यांनी आरडाओरडा केला. आजूबाजूच्या काही लोकांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. चोरट्यांचे वय अंदाजे 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे, तसेच त्यांनी तोंडाला मास्क लावलेले असल्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही.
या घटनेनंतर उमा लाठी यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दाखल केली.