जळगावात भीषण अपघात ; टेम्पोच्या धडकेने प्रौढ ठार, तिघे गंभीर जखमी

Terrible accident in Jalgaon; Adult killed, three seriously injured after being hit by tempo जळगाव (3 सप्टेंबर 2025)  भरधाव मिनी टेम्पोने रस्त्याच्या कडेला असलेल्या वाहनांना धडकत दुकानात शिरला व या अपघातात नवजीवन कॉलनीतील रहिवासी स्वप्नील अशोक कापूरे (40) यांचा मृत्यू ओढवला तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. मंगळवारी सायंकाळी रामानंद नगरचा घाट चढत असताना हा अपघात घडला.

जळगावात अपघाताची मालिका कायम
मृत स्वप्निल कापूरे हे शहरातील वाघ नगरातील नवजीवन कॉलनीत कुटुंबासह वास्तव्यास होते. ते एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते तर त्यांच्या पत्नी एरंडोल येथे भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत आहेत. अपघाताच्या वेळी स्वप्निल त्यांच्या (एमएच 19, ईक्यू 4213) क्रमांकाच्या दुचाकीवरून कामावरून घरी परतत असताना त्यांचा मृत्यू ओढवला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, रामानंद नगरचा घाट चढताना मिनी टेम्पो (विना क्रमांक) भरधाव वेगाने पुढे सरकत असताना घाटाच्या एका तीव्र वळणावर अचानक टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पोने समोरून येणार्‍या दुचाकीस्वार स्वप्निल कापूरे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेने स्वप्निल यांची दुचाकी टेम्पोच्या खाली अडकली आणि त्यांना फरफटत 40 ते 50 फुटांपर्यंत नेले. त्यानंतर टेम्पो हवेत उडून रस्त्याच्या कडेला असलेल्या ‘शांती फर्निचर’ या दुकानात जाऊन आदळला. हा थरारक अपघात सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास घडला.

नागरिकांची धाव, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल
अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. टेम्पोच्या खाली अडकलेल्या स्वप्निल कापूरे यांना बाहेर काढण्यासाठी मोठी गर्दी झाली. परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले आणि सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे स्वप्निल कापूरे यांचा उपचारादरम्यानच दुर्दैवी अंत झाला.

या अपघातात स्वप्निल कापूरे यांच्यासह आणखी तीन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.