साकळीजवळ भीषण अपघात : दुचाकीस्वार तरुण ठार

Terrible accident near Sakli : Young biker killed यावल (5 सप्टेंबर 2025) : यावल-चोपडा राज्य महामार्गावरील साकळी गावाजवळ सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात यावलचा तरुण ठार झाला. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मोहित रवींद्र कुवर (25, रा.धनगरवाडा, यावल) असे मयताचे नाव आहे.

अवघ्या चार महिन्यांपूर्वी विवाह झालेला मोहित हा दुचाकी (क्र. एमएच 19 एक्स 1744) वरून यावलच्या दिशेने जात होता. सोमवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास साकळी गावाजवळील भारत टोलकाटक्यानजीक सुनिल प्रविण पाटील (रा. किनगाव, ता. यावल) यांच्या ताब्यातील क्रूझर वाहन (क्र.एमएच 19 बियु 2129) व मोहितच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली.

धडक इतकी भीषण होती की मोहित कुवर याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मोहीतला रुग्णालयात दाखल केले असता त्याला तपासून मयत घोषित करण्यात आले. यावल पोलिस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली.

पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.