पुण्यातील नाना पेठेत 19 वर्षीय तरुणाची तीन गोळ्या झाडून हत्या

Pune shaken : Son of accused in Vanraj Andekar murder case shot dead three times पुणे (5 सप्टेंबर 2025) : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वनराज आंदेकर टोळीतील मुख्य आरोपी गणेश कोमकरच्या मुलाची आंदेकर टोळीने तीन गोळ्या झाडून हत्या केली आहे. या गोळीबारात गोविंद कोमकर या तरुणाचा मृत्यू झाला.

काय घडले पुण्यात ?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाला एक वर्ष पूर्ण होताच आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला. पुण्यातील नाना पेठ परिसरात श्री लक्ष्मी हाऊसिंग सोसायटीतील इमारतीच्या पार्किंगमध्ये शनिवारी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास झालेल्या खुनी हल्ल्यात वनराज आंदेकर टोळीतील मुख्य आरोपी गणेश कोमकरच्या 19 वर्षीय मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मृताचे नाव गोविंद कोमकर असे असून त्याला तीन गोळ्या लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

हत्येचा घेतला वर्षभराने बदला
गतवर्षी 1 सप्टेंबर 2024 रोजी नाना पेठेत वनराज आंदेकर यांचा गोळीबार आणि कोयता हल्ला करून खून करण्यात आला. या प्रकरणात बहिणीचा दीर गणेश कोमकर हा मुख्य आरोपी आहे. या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर गटाने रेकी करून गोविंद कोमकर याला लक्ष्य केल्याचे सूत्रांचे सांगणे आहे.

या हल्ल्यानंतर नाना पेठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचा मृतदेह ताब्यात घेवून ससून रुग्णालयात शवाविच्छेदनासाठी पाठवला.