Akola shaken : Fatal attack on Vanchit leader Rajendra Patode’s son अकोला (5 सप्टेंबर 2025) : वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांच्या मुलावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती मिळताच वंचितच्या समर्थकांनी हल्ला करणार्या तरुणाच्या घराची आणि वस्तूंची तोडफोड केल्याचे वृत्त आहे. या घटनेने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे. पातोडे यांच्या मुलावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पातोडे यांचा मुलगा गंभीर
वंचित समर्थकांकडून झालेल्या तोडफोडीच्या घटनेची माहिती मिळताच अकोल्यातील खदान आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अकोला शहरातील आदर्श कॉलनीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला होता. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मुलावर शुक्रवारी शेजारीच राहणार्या इंगोले कुटुंबातील एका सदस्याने हल्ला केला होता त्यामध्ये पातोडे यांचा मुलगा गंभीर स्वरूपात जखमी झाला.
रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जमले आहेत तर पातोडे यांच्या मुलावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच राजेंद्र पातोडे यांनी त्यांच्या समर्थकांना सोबत घेत इंगोले यांच्या घरावर हल्ला चढवला. त्यावेळी, समर्थकांनी शेजारच्या घरातील वस्तूंची तोडफोड करत मोठे नुकसान केले तसेच घराच्या अंगणात उभी असलेली कार देखील पेटवून दिली.