Accused who threatened to bomb Mumbai arrested from Noida मुंबई (6 सप्टेंबर 2025) : मुंबई पोलिसांना धमकीचा संदेश पाठवण्यात आल्याने यंत्रणा हायअलर्टवर होती. या संदेशात ‘लष्कर-ए-जिहादीचे 14 दहशतवादी मुंबईत शिरले असून दहशतवाद्यांनी 34 वाहनांमध्ये 400 किलो आरडीएक्स बसवले आहे. ते एक मोठा स्फोट करणार आहेत, ज्यामध्ये एक कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा उल्लेख असल्याने पोलिसांनी संशयीतांचा शोध घेतल्यानंतर त्यास शनिवारी उत्तर प्रदेशातील नोएडा येथून अटक करण्यात आली. अश्विन कुमार सुप्रा (50) असे अटकेतील आरोपीचे आहे. तो बिहारमधील पाटणाचा रहिवासी आहे.

धमकी मिळताच, मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जाहीर केला आणि तपास गुन्हे शाखेकडे सोपवला. दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि इतर सुरक्षा एजन्सी देखील सतर्क होत्या. तपासानंतर, मुंबई गुन्हे शाखेने नोएडा गाठले आणि सेक्टर-79 मधील एका सोसायटीमधून आरोपीला अटक केली.
पोलिसांनी आरोपीचा फोन आणि सिम कार्ड जप्त केले आहे. याशिवाय त्याच्याकडून 4 सिम कार्ड होल्डर, 6 मेमरी कार्ड होल्डर, एक सिम स्लॉट एक्सटर्नल, दोन डिजिटल कार्ड जप्त करण्यात आले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनने चौकशीदरम्यान मुंबई पोलिसांना सांगितले की, 2023 मध्ये तो एका फसवणुकीच्या प्रकरणात तीन महिने पाटणा तुरुंगात होता. त्यानंतर फिरोज नावाच्या व्यक्तीने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
तेव्हापासून त्याला फिरोजकडून बदला घ्यायचा होता, म्हणून त्याने त्याच्या नावाने मुंबई पोलिसांना संदेश पाठवला, असे अश्विनने सांगितले. तथापि, फिरोज कोण आहे आणि फसवणुकीचे प्रकरण काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.