वरणगाव एसआरपी प्रशिक्षण केंद्रासाठी 16 कोटींचा निधी मंजूर : वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची माहिती

पहिल्या टप्प्यातील 462 पदांना तत्काळ मंजुरी : उर्वरीत पदे लवकरच भरण्यात येणार

Fund of Rs 16 crores approved for Varangaon SRP Training Center: Information from Textiles Minister Sanjay Savkare भुसावळ (8 सप्टेंबर 2025) : भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे राज्य राखीव पोलिस दलाचा नवीन गट स्थापन करण्यास अखेर महाराष्ट्र शासनाची मंजुरी मिळाली आहे. गृह विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार या गटासाठी एकूण 1380 पदांची निर्मिती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील 462 पदांना तत्काळ मंजुरी देण्यात आली असून उर्वरित पदे टप्प्याटप्प्याने भरण्यात येणार आहेत. प्रशिक्षण केंद्रासाठी मंजूर झालेल्या पदांकरिता लागणार्‍या खर्चासाठी शासनाने 15 कोटी 90 लाख 72 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासही मान्यता दिली असल्याची माहिती भुसावळचे आमदार व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली.

ही पदे भरण्यात येणार
वरणगाव येथे उभारण्यात येत असलेल्या  राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षण केंद्रात वरिष्ठ पोलिस अधिकारी, निरीक्षक, उपनिरीक्षक, हवालदार, सशस्त्र पोलीस शिपाई, चालक, मोटार वाहन विभागातील कर्मचारी, संदेश विभाग, लेखनिक वर्ग, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, स्वयंपाकी आणि सेवक अशा विविध पदांचा समावेश राहणार आहे. यापैकी 450 पदे नियमित आणि 12 पदे मणुष्यबळ सेवा बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यात येणार असल्याचेही शासन निर्णायातून स्पष्ट करण्यात आले आहे.

रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार
या निर्णयामुळे भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे राज्य राखीव पोलिस दलाचे केंद्र प्रत्यक्षात उभारले जाणार आहे. स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहे. वरणगावमधील हे प्रशिक्षण केंद्र दुसर्‍या जिल्ह्यात पळविण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी काही महिन्यांपूर्वी केला होता परंत  वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर ते वरणगाव येथे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या संदर्भात अधिकृत निर्णय गृह विभागाने घेतल्यानंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

1380 पदे भरण्यात येणार
वरणगावमधील प्रशिक्षण केंद्रासाठी 1380 पदे नव्याने निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पद निर्मितीचा प्रस्ताव विहित पद्धतीने उपसमिती आणि उच्चस्तरीय सचिव समितीसमोर सादर करण्यात येईल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

गोपीनाथ मुंडेंच्या हस्ते भूमिपूजन
शिवसेना-भाजपचे सरकार असताना 1999 मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याहस्ते भुसावळ तालुक्यात वरणगाव येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन झाले होते. त्यासाठी सुमारे 106 एकर जागा देखील हस्तांरित करण्यात आली होती. प्रत्यक्षात, भूमिपूजनानंतर प्रशिक्षण केंद्राचे काम सुरू झालेच नाही. दरम्यानच्या काळात शासनाकडून अचानक पोलस प्रशिक्षण केंद्राचा प्रस्ताव रद्द करून ते अन्य ठिकाणी पळविण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला होता मात्र उशिरा का होईना वरणगावमधील पोलीस प्रशिक्षण केंद्राचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

मुख्यमंत्र्यांचे आभार : नवीन गाव वसवण्यात येणार
मंत्री संजय सावकारे म्हणाले की, मध्यंतरी रद्द झालेले प्रशिक्षण केंद्र परत वरणगावला मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. गत महिन्यात जागेची मोजणी होवून त्याचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आला. आता पदनिर्मिती व त्याच्या खर्चालाही मंजुरी मिळाल्याने बांधकाम लवकरच सुरू होईल. या केंद्रामुळे स्थानिक तरुणांनाही सराव करण्यासाठी मैदान मिळेल शिवाय दिड हजार कुटूंबे या ठिकाणी वास्तव्यास येवून एक नवीन गाव वसवले जाईल. या ठिकाणी सीबीएसई शाळा सुरू होईल, असेही मंत्री सावकारे यांनी सांगितले.