विद्येच्या माहेरघरात श्री विसर्जनाला गालबोट : विविध घटनांमध्ये चार गणेश भक्तांचा मृत्यू

Ganpati immersion tragedy : Four Ganesh devotees drown in separate incidents पुणे (8 सप्टेंबर 2025) : विघ्नहर्त्याला राज्यभरात मोठ्या भक्तीभावाने निरोप देण्यात आला मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये गणपती विसर्जनला गालबोट लागले. श्रींना निरोप देताना चार गणेशभक्त पाण्यात बुडाल्याची घटना वाकी बुद्रुक, शेलपिंपळगाव व बिरदवडी येथे घडली तर यातील दोघांचा मृत्यू झाला असून उर्वरित दोन युवकांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

काय घडले पुण्यात
प्रियदर्शन शाळेजवळील भामा नदीत विसर्जनासाठी गेले असताना अभिषेक संजय भाकरे (21, रा.कोयाळी, ता. खेड) आणि आनंद जयस्वाल (28, रा.उत्तर प्रदेश) हे दोघे पाण्यात बुडाले. त्यातील आनंद जयस्वाल याचा मृतदेह मिळून आला असून अभिषेक भाकरे याचा शोध चाकण पोलिस, एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि रेस्क्यू पथकाच्या मदतीने सुरू आहे.

शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील भामा नदीत गणपती विसर्जनासाठी गेले असताना रवींद्र वासुदेव चौधरी (वय 45, रा. शेलपिंपळगाव) हे पाण्यात वाहून गेले. त्यांचा अद्याप शोध सुरू आहे.

बिरदवडी (ता. खेड) येथे विसर्जन करताना तोल गेल्याने संदेश पोपट निकम (वय 35, रा. बिरदवडी) हे विहिरीत पडून बुडाले. चाकण पोलिसांसह एनडीआरएफ व अग्निशमन दलाच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, पुढील तपासासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.