किनगावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला जिल्हाधिकार्‍यांची मान्यता

Chhatrapati’s equestrian statue to be erected soon in Kingaon : District Collector approves यावल (10 सप्टेंबर 2025) : यावल तालुक्यातील किनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याच्या मान्यते करिता जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठवण्यात आला होता. जिल्हाधिकारी यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली असून या संदर्भातील अश्वारूढ पुतळा मंजुरीचे पत्र त्यांनी बुधवारी सरपंच यांना सुपूर्द केले. . गावात आता लवकरच भव्य, दिव्य छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला जाणार आहे.

गावात लवकरच होणार पुतळ्याची उभारणी
किनगाव बुद्रुक, ता.यावल या गावात प्रवेश करतांना आठवडे बाजाराकडे जाणार्‍या रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठीची नियोजित जागा आहे. तेथे अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा यासाठी माजी आमदार रमेश चौधरी, किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच स्नेहल मिलिंद चौधरी, त्यांचे पती मिलिंद चौधरी सह आदींनी पुढाकार घेतला होता. यासाठी एक समिती देखील त्यांनी स्थापन केली होती.

दरम्यान समिती तसेच ग्रामपंचायत किनगाव बुद्रुक यांच्या वतीने आवश्यक त्या परवानग्या काढण्यात आल्या होत्या व तो एक सक्षम प्रस्ताव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे पाठवण्यात आला होता. या संपूर्ण प्रस्तावाची पडताळणी करून बुधवार, 10 रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी किनगाव गावातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास मान्यता दिली तसेच या संदर्भाचे पत्र जिल्हाधिकारी यांनी जळगाव कार्यालयात सरपंच चौधरी यांना बोलावून त्यांना सुपूर्द केले आहे. दरम्यान किनगावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला मंजुरी मिळाली म्हणून आनंदाचे वातावरण आहे.