घातपाताचा प्रयत्न : संभाजीनगरात रेल्वे रुळावर ठेवले सिमेंट ब्लॉक

नंदीग्राम, मालगाडीच्या धडकेत ब्लॉक चक्काचूर ; मात्र दोन्ही इंजिनांचे नुकसान

Suspected of arson : Cement block placed on railway tracks in Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर (11 सप्टेंबर 2025) : संभाजीनगरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घातपात घडवण्याच्या दृष्टीने रेल्वे रूळांवर सिमेंट ब्लॉक ठेवण्यात आल्याचा प्रकार चिकलठाणा शिवारात मंगळवार, 9 सप्टेंबर रात्री रेल्वे रुळावर सिमेंट काँक्रीटचे ब्लॉक ठेवून घातपाताचा प्रयत्न झाला. 23 मिनिटांच्या अंतरात 2 ठिकाणी हे ब्लॉक ठेवण्यात आले तर रेल्वेच्या धडकेत काँक्रिटचे ब्लॉक चक्काचूर झाले व दोन्ही रेल्वेंच्या इंजिनाचे नुकसान झाले.

काय आहे नेमका प्रकार
मंगळवारी रात्री 12.35 ते 12.58 या वेळेत चिकलठाणा शिवारातील केंब्रिज उड्डाणपुलाजवळ अज्ञातांनी सिमेंट ब्लॉक ठेवले. पहिली रेल्वे गेल्यानंतर 800 मीटर अंतरावर अशाच प्रकारे काँक्रीटचे तुकडे ठेवल्याचे समोर आले. याबाबत करमाड येथील रेल्वे पथकाचे कनिष्ठ अभियंता अनुजकुमार सोरनसिंह (29) यांनी तक्रार दिली.

कंट्रोलला मेसेज अन् यंत्रणेची धावपळ
नंदीग्राम एक्स्प्रेस संभाजीनगरहून जालन्याकडे जात असताना चालकाला रात्री साडेबाराच्या सुमारास हा प्रकार दिसला. सिमेंट ब्लॉकना इंजिनाच्या कॅटल गार्डची टक्कर लागली. ‘नंदीग्राम’ला करमाडला थांबा नसल्याने लोको पायलटने जालना स्टेशन मास्तरला घटनेची माहिती दिली. त्यानंतर आणखी एक मालगाडी जालन्याकडे जाताना काही अंतरावर हाच प्रकार घडला. हे ठिकाण नंदीग्राम एक्स्प्रेसच्या घटनास्थळापासून 800 मीटरवर आहे. ही माहिती नांदेड कंट्रोलवरून अनुजकुमार यांना कळवण्यात आले. त्यांनी कर्मचारी झिरवालसोबत घटनास्थळी धाव घेतली.

चौकशीचे आदेश
करमाड व चिकलठाणा रेल्वेस्टेशनदरम्यान झालेली घटना गंभीर आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचे दक्षिण मध्य रेल्वे विभागीय सुरक्षा आयुक्त अमित शर्मा म्हणाले.

एटीएसने केला पंचनामा
ही घटना केवळ दरोड्याच्या उद्देशाने केली गेली की यामागे घातपाताचा हेतू आहे याचा तपास पोलिस करत आहेत. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एटीएसचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रेल्वे रुळांचा आणि सिमेंटच्या तुकड्यांचा पंचनामा केला.