Bhusawal hawkers to migrate before Navratri: Former corporator Niki Batra ends hunger strike after assurance भुसावळ (11 सप्टेंबर 2025) : भुसावळातील अप्सरा चौकातील फेरीवाल्यांचे गणपती मंदिराजवळील जागेत स्थलांतर करावे, या मागणीसाठी भाजपचे माजी नगरसेवक तथा मंत्री संजय सावकारे यांचे निकटवर्तीय निकी उर्फ प्रकाश बतरा यांनी बुधवार, 10 सप्टेंबर रोजी उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला शहरातील व्यापारी व दुकानदारांनी पाठिंबा दर्शवण्यासाठी आपली दुकाने बंद ठेवल्यानंतर रात्री उशिरा मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी उपोषणार्थींची भेट घेत 22 सप्टेंबर पूर्वी अर्थात नवरात्रोत्सवापूर्वी फेरीवाल्यांचे स्थलांतर करण्याचे तसेच भोगवटा नावे लावण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

दोन महिने उलटूनही सुविधा नाही
मुख्य बाजारपेठेतील डिस्को टॉवर, अप्सरा चौक या भागातील 100 फेरीवाल्यांना पालिकेने गणपती मंदिराजवळ पर्यायी जागा दिली आहे. एक महिन्यात तेथे सुविधा देण्याचे आश्वासन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी बैठकीत दिले होते. प्रत्यक्षात दोन महिने उलटून सुद्धा तिथे सुविधा दिल्या नाहीत. यामुळे फेरीवाल्यांचे तेथील स्थलांतर झाले नाही. या फेरीवाल्यांचे नियोजित जागेवर तातडीने स्थलांतर करावे, या मागणीसाठी निकी बतरा यांनी बुधवारी उपोषण छेडले होते. याच दिवशी दुपारी 4.30 वाजता पालिकेचे अभियंता पंकज मदगे यांनी तेथे भेट देवून 15 दिवसांची मुदत मागितली. पण, उपोषणकर्त्यांनी त्यास नकार देत 21 सप्टेंबरपूर्वी हॉकर्स झोन स्थलांतरीत करावा, अन्यथा बेमुदत उपोषण सुरुच राहिल, असा आक्रमक पवित्रा घेतला.
अनेकांनी दिला पाठिंबा
निकी बतरा यांच्या उपोषणावेळी माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर, भाजप शहराध्यक्ष किरण कोलते, रमेश नागराणी, अजय नागराणी, व्यापारी नंदलाल नागदेव, मनोहर सोढाई, रमेश आठवाणी, सुदाम बढेजा यांची उपस्थिती होती. भाजप व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष मनोज बियाणी, भाजप पदाधिकारी प्रमोद सावकारे यांनी भेट देवून पाठिंबा दर्शवला. शहर व्यापारी मंडळ अध्यक्ष राधेश्याम लाहोटी यांनीही पाठिंबा दिला.
पालिका प्रशासन नरमले : 22 पूर्वी होणार स्थलांतर
मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी शहरातील व्यापारी व विक्रेत्यांमध्ये सुरू असलेला संघर्ष व उपोषणानंतर 22 सप्टेंबर पूर्वी विक्रेत्यांचे स्थलांतर करण्याचे तसेच भोगवटा नावावर लावण्याचे लेखी आश्वासन यावेळी निकी बतरा यांना दिले. यावेळी उद्योजक मनोज बियाणी, माजी नगरसेवक किरण कोलते, राधेश्याम लाहोटी, गुड्डू अग्रवाल, शाम दरगड, रमेश अठवाणी, ग्यानचंद लेखवाणी, सुदाम बठेजा आदींची उपस्थिती होती.