Mobile thief from Bhusawal city caught by Railway Protection Force भुसावळ (11 सप्टेंबर 2025) : भुसावळ रेल्वे स्थानकावर ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत रेल्वे प्रवासी सुरक्षा दल (आरपीएफ) गुन्हे रोख पथक टीमने मोबाईल चोरी करणार्या संशयीताला अटक करून करून लोहमार्ग पोलिसांकडे सुपूर्द केले आहे.

अशी झाली कारवाई
मंगळवार, 9 सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे 9.30 वाजता भुसावळ स्थानकाच्या दक्षिणेकडील पार्किंग परिसरात संशयास्पद हालचाल करणार्या तरुणाला गुन्हे रोख पथकातील हवालदार महेंद्र कुशवाहा, इमरान खान आणि देवेंद्र दीक्षित यांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी करताना समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याला आरपीएफ ठाण्यात आणण्यात आले. चौकशीत त्याने आपले नाव समीर इस्लामुद्दीन तेली (22, रा.अक्सा कॉलनी, पाटील मोहल्ला, खडका रोड, भुसावळ) असे सांगितले. पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे आकाशी निळ्या रंगाचा मोबाईल (किंमत अंदाजे 28 हजार रुपये)
मिळाला. चौकशीदरम्यान संशयीताने हा मोबाईल शनिवार, 6 सप्टेंबर रोजी भुसावळ स्थानकावर उभी असलेल्या गोरखपूर-पनवेल एक्सप्रेस (गाडी क्रमांक 15065) च्या स्लीपर कोचमध्ये झोपलेल्या प्रवाशाकडून चोरल्याचे कबूल केले.
यावेळी एएसआय दीपक कावळे यांनी पंचनामा करून मोबाईल जप्त केला व संशयीताला मोबाईलसह लौहमार्ग पोलिसांकडे सुपूर्द केले. रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रीया राबविण्यात आली.