Big relief for passengers : Extension of Bhusawal-Dadar and Lokmanya Tilak Terminus-Gaumati Nagar special trains भुसावळ (11 सप्टेंबर 2025) : रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून सणासुदीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष गाड्यांच्या सेवेत वाढ करण्यात आली आहे. भुसावळ-दादर दरम्यान धावणार्या विशेष गाड्यांचा कालावधी वाढविण्यात आला असून, त्याचबरोबर लोकमान्य टिळक टर्मिनस-गोमतीनगर दरम्यान विशेष उत्सव गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे भुसावळ जंक्शनवरून प्रवास करणार्या प्रवाशांना या सुविधांचा लाभ मिळणार आहे.

रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन भुसावळ-दादर दरम्यान धावणार्या विशेष गाड्यांचा कालावधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आला आहे.
दादर एक्स्प्रेसला मुदतवाढ
गाडी 09049 दादर-भुसावळ त्रीसाप्ताहिक विशेष व गाडी 09050 भुसावळ-दादर त्रीसाप्ताहिक विशेष या पूर्वी 26 सप्टेंबरपर्यंत अधिसूचित होत्या, त्या आता 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. गाडी 09051 दादर-भुसावळ त्रीसाप्ताहिक विशेष व गाडी 09052 भुसावळ-दादर त्रीसाप्ताहिक विशेष या पूर्वी 29 सप्टेंबरपर्यंत अधिसूचित होत्या, त्या देखील आता 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. या विशेष गाड्यांच्या वेळ, थांबे व रचनेत कोणताही बदल नाही.
लोकमान्य टिळक टर्मिनस-गोमतीनगर उत्सव विशेष
दिवाळी व छठ सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस-गोमतीनगर दरम्यान विशेष साप्ताहिक उत्सव गाडी चालविण्यात येणार आहे.गाडी 05326 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोमतीनगर साप्ताहिक विशेष गाडी 28 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटेल. गाडी 05325 गोमतीनगर-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी 27 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शनिवारी गोमतीनगरहून सुटेल.
या गाड्यांना कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती, झाशी, कानपूर, लखनऊ सिटी यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे असतील. गाड्यांच्या रचनेत वातानुकूलित, शयनयान तसेच सामान्य श्रेणीच्या डब्यांचा समावेश असेल. या विशेष गाड्यांच्या सेवांचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.