राज्यात पावसाचे जोरदार कमबॅक : जळगाव जिल्ह्यासाठी आयएमडीचा हा इशारा

Heavy rains expected in the state : IMD warns of heavy rains in Jalgaon district जळगाव (12 सप्टेंबर 2025) : राज्यात पावसाचे जोरदार कमबॅक होणार असून जळगाव जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस होईल अशा अंदाज वर्तवलाय. तर कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये साधारणपणे ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल

पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मात्र जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. यात पुणे, सातारा, सांगली,सोलापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. सोलापूरमधील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगरलाही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर उर्वरित धुळे, नाशिक, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यामधील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज आहे.

दुसरीकडे मरावाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज आहे. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. तर धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. जालना आणि छत्रपती संभाजी नगरमधील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल, असा अंदाज आहे.

तर संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 12 सप्टेंबर रोजी वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामधील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय. विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.