भुसावळ ग्रामीण रुग्णालयात आरोग्य मंत्र्यांची झाडाझडती : अस्वच्छता पाहून व्यक्त केला संताप

Health Minister points finger at cleanliness in Bhusawal Rural Hospital : A surprise visit sparks a stir भुसावळ (12 सप्टेंबर 2025) : जळगाव रोडवरील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरला गुरुवारी दुपारी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अचानक भेट दिली. रुग्णालयाच्या आवारातील अस्वच्छता,वाढलेली झाडे आणि एकंदर स्थिती पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. अवघ्या दहा मिनिटांच्या या भेटीत त्यांनी रुग्णालयाची संपूर्ण पाहणी करून वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना कामाच्या बाबतीत सक्त सूचना केल्यात.

अस्वच्छतेवर मंत्र्यांचे बोट
रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळल्याने मंत्री आबीटकर म्हणाले की, हे रुग्णालय महामार्गालगत आहे. रेल्वे जंक्शन असल्याने दररोज अनेक रुग्णांची ये-जा होत असते. अशा स्थितीत येथे नेहमी स्वच्छता व सोयी-सुविधा अद्यावत राहायला हव्यात.रुग्ण सेवेत कोणतीही हलगर्जीपणा चालणार नाही. त्यांनी रुग्णालयात दररोज किती रुग्ण ओपीडीमध्ये येतात, किती जण उपचारासाठी दाखल होतात, कोणती उपकरणे उपलब्ध असून त्यांचा प्रत्यक्षात किती वापर केला जातो, याची सविस्तर माहिती घेतली. ओपीडी रुग्णसंख्या वाढवावी आणि दाखल रुग्णांना दर्जेदार उपचार मिळतील याकडे विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय कुरकुरे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. ट्रॉमा केअर सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे,जेणेकरून महामार्गावरील अपघातग्रस्त रुग्णांवर त्वरित उपचार होतील,अशा सूचना त्यांनी दिल्या

डॉ.कुरकुरे म्हणाले की,रुग्णालयासाठी आवश्यक साहित्य आणि साधनसामग्रीची मागणी वरिष्ठांकडे केली आहे. मिळणार्‍या साधनांचा पुरेपूर वापर करून रुग्णांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न होईल.
अचानक झालेल्या या पाहणीमुळे रुग्णालयातील कर्मचार्‍यांमध्ये काही काळ धावपळ उडाली मात्र मंत्री आबिटकर यांनी प्रत्यक्ष समस्या जाणून घेतल्या आणि रुग्णालय अधिक सक्षम, स्वच्छ व रुग्णाभिमुख करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले.