अप्सरा चौकात दिवाळीपर्यंत करू द्यावा व्यवसाय : भुसावळात पथविक्रेत्यांचे उपोषण

More than a hundred street vendors on hunger strike in Bhusawal भुसावळ (12 सप्टेंबर 2025) : शहरातील अप्सरा चौक ते वाल्मिक चौकादरम्यान गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे हातगाडीधारक हॉकर्स (पथविक्रेते) अक्षरशः देशोधडीला लागले आहेत. गेल्या 10 जूनपासून व्यवसाय बंद असल्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या अन्यायाविरोधात गुरूवार, 11 सप्टेंबर रोजी भुसावळ नगरपालिका पथविक्रेता समिती आणि राष्ट्रीय हॉकर्स संघटनेच्या नेतृत्वाखाली हातगाडीधारकांनी उपोषण सुरू केले. अप्सरा चौकातील जागेत दिवाळीपर्यत व्यवसाय करू द्यावा, अशी प्रमुख मागणी विक्रेत्यांनी केली आहे.

व्यवसाय थांबल्याने उपासमारीची वेळ
गेल्या 30 ते 35 वर्षांपासून या भागात आपला व्यवसाय करणार्‍या हॉकर्सनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून त्यांचा उदरनिर्वाह पूर्णपणे थांबला आहे. या रस्त्यावरील सुमारे 250 हॉकर्सचे कुटुंब यामुळे आर्थिक संकटात सापडले आहे.अशा परिस्थितीत काही व्यापारी आणि माजी नगरसेवकांना हाताशी धरून प्रशासनाकडून पथविक्रेत्यांना नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे.

हक्काची जागा मिळावी : राजू सपकाळे
आंदोलनाचे नेतृत्व करणारे राष्ट्रीय हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष राजू सपकाळे यांनी सांगितले की, आम्ही फक्त आमच्या हक्काची जागा मागत आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही येथे व्यवसाय करतो, पण आता रस्त्याच्या कामामुळे आमचा रोजगार हिरावला गेला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत,तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे.

या निवेदनावर राजू सपकाळे यांच्यासह गोपाल पुरोहित, साजिद बागवान, सागर ठाकूर आणि उज्ज्वला राजपूत यांची स्वाक्षरी आहे.जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार हॉकर्सनी व्यक्त केला आहे, या गंभीर प्रश्नावर प्रशासन काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

अश्या आहेत मागण्या
भोगवटा पावतीसह व्यवसायासाठी निश्चित जागा उपलब्ध द्यावी तसेच उपलब्ध केलेल्या जागेवर स्ट्रीट लाईटचे पोल आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, डोम मार्केटच्या धर्तीवर कायमस्वरूपी मार्केट उभारावे जेणेकरून भविष्यात अशा समस्या उद्भवणार नाहीत. सध्याच्या परिस्थितीत जुन्या जागेतच व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी मिळणे ही त्यांची महत्वाची मागणी आहे. याशिवाय नवीन जागेवर जाण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करू नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

पथविक्रेत्यांनी केले व्यवसाय बंद
गुरूवारी पथविक्रेत्यांनी सुरू केलेल्या उपोषणामुळे सर्व पथविक्रेत्यांनी त्यांचे व्यवसाय बंद ठेवले होते. सर्वच विक्रेते हे उपोषणाच्या ठिकाणी उपस्थित होते. जोपर्यत निर्णय होत नाही तोपर्यत उपोषण सुरू राहणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष राजु सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली सांगण्यात आले. शंभराहून अधिक विक्रेत्यांनी हातगाडीवरील व्यवसाय बंद करून उपोषणाच्या ठिकाणी थांबले होते. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.