रेल्वे प्रवाशांनो ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची : नागपूरातील प्लॅटफार्म क्रमांक पाच 52 दिवसांसाठी बंद

मडगाव-नागपूर एक्सप्रेसचा अजनीवर शेवट ; प्रवासी स्थानकात तात्पुरते बदल

भुसावळ (12 सप्टेंबर 2025) : नागपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत काँकोर्सच्या फाउंडेशनचे काम हाती घेण्यात येत आहे. यासाठी स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 हा 8 सप्टेंबर 2025 पासून 29 ऑक्टोबर 2025 पर्यंत म्हणजेच तब्बल 52 दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने दिली आहे. या कामामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी काही गाड्यांच्या आगमन व प्रस्थानाच्या ठिकाणी तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

असे झाले आहेत बदल
गाडी क्रमांक 01140 मडगाव-नागपूर एक्सप्रेस ही गाडी 8 सप्टेंबर ते 27 ऑक्टोबर या कालावधीत अजनी येथेच थांबवली जाईल. एकूण 15 फेर्‍या शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील तसेच गाडी क्रमांक 01139 – नागपूर-मडगाव एक्सप्रेस ही गाडी 10 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान अजनी स्थानकावरून सुरू केली जाईल. याही गाडीच्या 15 फेर्‍यांवर परिणाम होणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून होणार्‍या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला आहे. प्रवाशांनी प्रवासाआधी वेळापत्रक तपासून योग्य त्या योजना आखाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

रेल्वे स्टेशनवर सुरू करण्यात आलेल्या प्लॅटफॉर्मच्या कामामुळे आता अजनी स्थानकावरून रेल्वे गाड्या सुटणार आहे. यामुळे प्रवाशांना आता नागपूर ऐवजी अजनी स्थानकावर जावे लागणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केले आहे.