कन्या जन्माचा आनंद ठरला औट घटकेचा : पत्नीला भेटण्यासाठी आलेल्या मालोदच्य तरुणाचा आरोग्य केंद्राच्या आवारातच मृत्यू

Husband dies after collapsing while giving tea to wife : Adgaon incident यावल (14 सप्टेंबर 2025) : यावल तालुक्यातील आडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र प्रसुत झालेल्या पत्नीसाठी 29 वर्षीय तरुण हा चहा घेऊन जात असताना अचानक त्याला चक्कर आले आणि तो प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातच कोसळला. त्यास स्थानिक डॉक्टरांनी तपासल्यानंतर यावल ग्रामीण रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. ही घटना शनिवारी घडली. मयत तरूण मालोद येथील रहिवासी असून याप्रकरणी यावल पोलिसात ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पवन उर्फ पप्पू रमेश खंबायत (29, मालोद, ता.यावल) असे मयताचे नाव आहे.

काय घडले तरुणासोबत ?
आडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पवन उर्फ पप्पू रमेश खंबायत (29, मालोद) या तरुणाच्या पत्नीला प्रसुतीसाठी दाखल केले होते. या विवाहितेला शुक्रवारी मुलगी झाली व शनिवारी पवन उर्फ पप्पू खंबायत हा पत्नीसाठी चहा घेऊन आरोग्य केंद्रात जात होता. आरोग्य केंद्राच्या आवारातच अचानक त्याला चक्कर आले आणि तो जमिनीवर कोसळून बेशुद्ध झाला. हा प्रकार निदर्शनास येताच नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली डॉक्टरांनी तपासणी केली व त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी धनराज लिमये यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी करीत आहे.