Fake claim of Mogra Devi’s power in body: DJ businessman in Amalner duped of Rs 18 lakhs with promise of double money, including gold अमळनेर (14 सप्टेंबर 2025) : अमळनेरातील एका डीजे व्यावसायीकाला महिलेने अंगात मोगरा देवीची शक्ती असल्याचे भासवत पैसे दुप्पट करण्यासह सोन्याच्या घागरी व देवीची मूर्ती काढून देईल, अशी थाप मारत तब्बल 18 लाखात गंडवल्याची घटना घडली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अमळनेरच्या बंगाली फाईल भागातील संशयीत मंगलाबाई बापू पवार (रामवाडी, केशवनगर, अमळनेर) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अशी झाली व्यावसायीक तरुणाची फसवणूक
राजेंद्र नारायण माळी (रामवाडी, बंगाली फाईल, अमळनेर) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 12 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांच्या आई भटाबाई माळी या महादेव मंदिरात पूजेसाठी गेल्यानंतर संशयीत मंगलाबाई बापू पवार भेटल्या व त्यांनी आपल्या अंगात मोगरा देवीचा वास असल्याचे सांगून तुझ्या घरी लक्ष्मी नाराज असल्याने तुझ्या मुलाचे लग्न जमत नसल्याचे थाप मारली व लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजेसाठी 25 हजार रुपये लागतील, नाहीतर तुमच्यावर मोठे संकट येईल, अशी भीती घातली.
भटाबाईन यांनी ही गोष्ट घरी आल्यावर सांगितल्यानंतर पूजा करण्यास सांगण्यात आले व त्याच दिवशी रात्री 11 वाजता मंगलाबाई त्यांच्या घरी मंगलाबाई आल्या व त्यांनी तुमच्या घराच्या मागे कानबाईची मूर्ती आहे आणि सोन्याच्या घागरी आहेत, त्या काढण्यासाठी साडेचार लाख रुपये आणून द्या व त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून नारायण माळी यांनी दुसर्या दिवशी बँकेतून साडे चार लाख रुपये काढून दिले. हे पैसे धान्याच्या कोठीत ठेवावे लागतील, असे सांगत ती बेडरूममध्ये गेली आणि घरातील सर्वांना बाहेर काढून दरवाजा आतून लावून घेतला.
पुन्हा चार दिवसांनी तिने घराच्या मागच्या बाजूने तांब्याची घागर काढून आणली व तिच्यात सोन्याचे दागिने आहेत, असे सांगून साडे तीन लाखांची मागणी केली. पुन्हा तीने एकटीने बेडरूममध्ये जाऊन साडे तीन लाख रुपये धान्याच्या कोठीत ठेवले. पुन्हा तिने तिसरी घागर काढून अडीच लाख रुपये मागितले नंतर चवथी घागर काढून पुन्हा अडीच लाख रुपये मागितले. प्रत्येकवेळी तिने पैसे कोठीत ठेवण्याच्या नावे, असे 14 लाख रुपये मागून घेतले.
अन् देवीचा मुखवटा काढला
पुन्हा मार्च महिन्यात तिने चमत्कारिकरित्या टोपलीतून देवीचा मुखवटा बाहेर काढला आणि पुन्हा अडीच लाख रुपये देवीच्या मुखवट्याजवळ ठेवायला लावले. तेही पैसे ती घरात एकटी जाऊन धान्याचे कोठीत ठेवून आल्याचे सांगितले मात्र ती पैसे कोठे ठेवत होती हे घरच्यांना देखील माहीत नव्हते. जून महिन्यात तिने पुन्हा सोन्याच्या घागरी आणि सोन्याची देवीची मूर्ती काढण्यासाठी पूजेचे साहित्य लागेल म्हणून दीड लाख रुपये मागितले. घर मालकाचे पैसे संपले आणि त्यांनी आम्हाला सोने, दुप्पट पैसे नको म्हणून आमचे पैसे कोठीतून काढून द्या असे सांगितल्यावर मंगलाबाई बापू पवार यांनी तुमच्या घरात पाच फणी नाग आहे तुम्ही घरात जाऊ नका म्हणून मनाई केली.
आरशाने केली महिलेची पोलखोल
त्यांनतर मंगलाबाईने सांगितले की. मोगरा मातेच्या कृपेने माझ्या जादूमुळे तुमच्या घरात पैशाचा ढीग लागला आहे. तो थांबवण्यासाठी तुम्हाला पुन्हा 80 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. पुन्हा ती 80 हजार रुपये घेऊन बेडरूममध्ये गेल्यानंतर भाऊ दीपक माळी याने आरश्यातून पाहिले असता संशयीत महिलेने 80 हजार रुपये स्वतःच्या साडीत लपवत असल्याचे बघितले. नंतर माळी कुटुंबाने धान्याच्या कोठीत ठेवलेले पैसे बघायला गेल्यानंतर तेथे काहीच आढळून आले नाही. आपली फसवणूक झाल्याचे कळताच राजेंद्र माळी यांनी पोलिसात धाव घेत मंगलाबाई बापू पवार विरोधात गुन्हा दाखल केला तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.