Ten people injured in compressor explosion at tea shop in Bhadgaon भडगाव (15 सप्टेंबर 2025) : डी-फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्यानंतरच्या दुर्घटनेत हॉटेल चालकाच्या मुलासह दहा नागरिक गंभी जखमी झाल्याची घटना भडगावच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील न्यू मिलन टी हॉटेलमध्ये रविवारी दुपारी सुमारे 1.30 वाजता घडली. गंभीर जखमींना पाचोरा, जळगाव आणि धुळे येथे हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

स्फोटाने बसला धक्का
हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी बसलेल्या नागरिकांना स्फोटाचा फटका बसला. जखमींमध्ये भडगावबाहेरील जिल्ह्यांतील आणि इतर राज्यातील नागरिकांचा समावेश आहे. हॉटेल चालकाचा मुलगा सोहिल मणियार (भडगाव) याला धुळ्यात हलवण्यात आले तर इतर जखमींवर पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल, सिद्धिविनायक हॉस्पिटल आणि ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जखमींना समर्पण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
जखमींमध्ये सोहिल मणियार (हॉटेल चालकाचा मुलगा, भडगाव), राजकुमार पवार (कर्नाटक), नितीन पाटील (सातारा), गजानन शेळके (जालना), रवींद्र सोनवणे, भडगाव, दिलीप पाटील, भडगाव, भूषण पाटील (जुवार्डी), मयूर राजपूत (वडधे), मोसिम खान (भडगाव), मिर्झा आणि इतर 3-4 नागरिकांचा समावेश आहे.
भडगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना प्राथमिक उपचारानंतर तत्काळ पाचोरा येथील खासगी रुग्णालयात हलविले गेले.
घटनेची माहिती मिळताच पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमींना मदत केली. घटनास्थळी आणि रुग्णालयात नातेवाईक व मित्रांच्या गर्दीमुळे तणाव निर्माण झाला. भडगाव पोलि स्टेशनच्या उपनिरीक्षक लक्ष्मी करनकाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे लक्ष्मण पाटील आणि इतर पोलिस कर्मचार्यांनी बंदोबस्त ठेवला.