Pune murder case: Bandu Andekar claims that he was beaten and threatened with shooting by the police पुणे (16 सप्टेंबर 2025) : पुण्यातील हत्याकांड प्रकरणी अटकेतील असलेल्या बंडू आंदेकरने कोर्टात खळबळजनक दावा केला आहे. बंडू आंदेकर याने पोलिसांकडून आपल्याला बेदम मारहाण केल्याचे सांगत पोलिसांनी गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा आरोपही केला आहे.

काय आहे प्रकरण
पुण्यातील नाना पेठेत 5 सप्टेंबर रोजी आयुष कोमकरची हत्या झाली होती. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 12 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अटकेत असलेल्या आरोपींमध्ये आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि प्रत्यक्षात आयुषवर गोळीबार करणार्या आरोपींचा समावेश आहे. या सर्वांना पोलिसांनी बुलढाणा आणि गुजरातमधून अटक केली आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणात शिवराज, शुभम, अभिषेक आणि लक्ष्मी आंदेकर यांना गुन्हे शाखेने सोमवारी न्यायालयात हजर केलें. या चौघांना ही 18 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.
कृष्णा मास्टर माईंड ?
आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकरचा मुलगा आणि मयत माजी नगरसेवक वनराज आंदेकरचा भाऊ कृष्णा आंदेकर मास्टरमाइंड असल्याचं सांगण्यात येत आहे. कृष्णा आंदेकरच्या सांगण्यावरूनच आयुषची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसांना सापडले आहेत. मात्र या प्रकरणातील मास्टर माइंड कृष्णा आंदेकर अद्याप फरार आहे. यावरूनच पोलिसांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावा बंडू आंदेकरने कोर्टात केला आहे.