उपसरपंच आत्महत्येनंतर प्रशासन ताळ्यावर ! तुळजाई कला केंद्राचा परवाना रद्द होणार !

धाराशिव (16 सप्टेंबर 2025) : बीडच्या गेवराई तालुक्यातील उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा केंद्रबिंदू असलेल्या तुळजाई कला केंद्राचा परवाना रद्द होण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. पोलिसांनी कला केंद्राचा परवाना रद्द करण्यासंबंधी अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला आहे.

उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात केंद्रबिंदू ठरलेल्या कलाकेंद्राचा परवाना रद्द करण्याचा पोलिसांनी अहवाल दिला आहे. कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिच्या प्रेमात गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली ती याच कला केंद्रात नर्तिकेचे काम करीत होती. नियम धाब्यावर बसवून कला केंद्रात काम चालायचे, अशा तक्रारी प्रशासनाकडे वारंवार होत होत्या. मात्र प्रशासनाने तक्रारींकडे कानाडोळा केला. परंतु बर्गे प्रकरणाची धग संपूर्ण जिल्हाभरात असल्याने पोलिसांनी तत्काळ परवाना रद्द करीत असल्याचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवला.

धाराशिवच्या वाशी पोलिसांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल पाठवला होता. यापूर्वी तहसीलदारांनी परवाना रद्द केल्यानंतर उपजिल्हाधिकारी यांनी परवाना रद्द करण्याला स्थगिती दिली होती.

पोलिसांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सर्व घटनाक्रमाचा अहवाल देत कला केंद्र बंद करण्याची शिफारस केली आहे. आता धाराशिवचे जिल्हाधिकारी तुळजाई कला केंद्राच्या परवान्याबाबत काय निर्णय घेणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.