आयएएस पूजा खेडकरांनी बदलीनंतर पहिल्याच दिवशी नियमांना बसवली हरताळ

वाशिक (16 सप्टेंबर 2025) : वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची पुण्यातून वाशिमला प्रशिक्षणासाठी बदली करण्यात आल्यानंतर प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी त्यांनी नियमांचं उल्लंघन केले.

पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षणाचा वाशिम येथील आज पहिला दिवस असून त्या मंगळवारी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या आहेत मात्र शेड्युलनुसार त्यांना आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाणं अपेक्षित होतं.

अधिकारी कर्मचार्‍यांना सरकारी कार्यालयात येण्याची वेळ राज्य सरकारने नऊ वाजता निश्चित केली आहे. मात्र असं असतानाही त्या तब्बल दोन तास उशिरानं जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या आहेत.

यावेळी त्यांनी पुन्हा एकदा प्रसार माध्यमांशी बोलण्यास नकार दिला, सध्या त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर सुरू असलेल्या आरोपांबाबत त्यांना विचारण्यात आलं, यावर बोलताना आपण त्यावर अधिकृतरित्या बोलू शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. नवी मुंबई पोलिसांनी महाराष्ट्राच्या गृह विभागाला सोपवलेल्या एका रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रिपोर्टनुसार प्रोबेशनरी अधिकारी पूजा खेडकर यांनी आपल्या एका नातेवाईकाला सोडवण्यासाठी नवी मुंबई पोलिसांवर दबाव टाकला होता. पूजा खेडकर यांनी स्टील चोरीप्रकरणात अटक करण्यात आलेल्या त्यांच्या एका नातेवाईकांच्या सुटकेसाठी नवी मुंबई पोलिसांवर दबाव टाकल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.