चाळीसगावात व्यापाऱ्याला लुटले; २.७१ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

चाळीसगावात व्यापाऱ्याला लुटले; २.७१ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

चाळीसगाव | प्रतिनिधी :
शहरातील गवळी वाडा परिसरात शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकानदारास लुटल्याची धक्कादायक घटना घडली. चोरट्यांनी व्यापाऱ्याच्या मोटारसायकलवर ठेवलेली बॅग हिसकावून त्यातील २ लाख ४१ हजार रुपये रोख, २० हजार रुपयांचा आयफोन ११ आणि १० हजारांचा वनप्लस मोबाईल असा एकूण २ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

या संदर्भात चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

घटनेचा तपशील असा की, उद्देश विनोद कोठारी (रा. चाळीसगाव) हे आपल्या किराणा दुकानातून काम आटोपून रात्री ९ वाजेच्या सुमारास मोटारसायकलवरून घरी जात होते. गवळी वाडा आणि राठोड हॉस्पिटल रोडच्या दरम्यान, काळ्या रंगाच्या युनिकॉन (MH 15 9269) मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या मोटारसायकलच्या पेट्रोल टाकीवर ठेवलेली बॅग हिसकावली आणि घटनास्थळावरून पलायन केले.

बॅगमध्ये मोबाईल फोन आणि मोठी रोख रक्कम होती. मागच्या सीटवर बसलेल्या चोरट्याने डोक्यावर लाल टोपी व अंगावर मरून रंगाचा शर्ट परिधान केला होता, अशी माहिती दिली गेली आहे.

व्यापाऱ्याने तात्काळ पाठलाग करत अंधशाळेपासून भडगाव रोडपर्यंत चोरट्यांचा माग घेतला. मात्र, चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. पाठलाग करत असताना उद्देश कोठारी हे दुचाकीवरून घसरून पडल्याने त्यांच्या उजव्या पायाला व गुडघ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या मुंबई येथे उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी उद्देश कोठारी यांच्या काका संदीप पारसमल कोठारी (रा. लक्ष्मीनगर, चाळीसगाव, ह.मु. रोहिणी अपार्टमेंट, देवपूर, धुळे) यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार योगेश माळी हे करीत आहेत.