मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक, एक फरार

मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक, एक फरार

जळगाव (प्रतिनिधी) –शहरातील प्रसिद्ध गोलाणी मार्केटमधील मोबाईल दुकान फोडणाऱ्या टोळीचा जळगाव शहर पोलिसांनी छडा लावत पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन संशयित चोरट्यांना अटक करण्यात आली असून, एक संशयित सध्या फरार आहे. पोलिसांनी या चोरट्यांकडून सुमारे ३० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल जप्त केले आहेत.

दुकान फोडून ५० हजारांचा ऐवज लंपास
१२ मे रोजी पहाटेच्या सुमारास गोलाणी मार्केटमधील ‘पूजा मोबाईल शॉपी’ या दुकानात चोरी झाली होती. चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला आणि ५० हजार रुपये किमतीचा मोबाईल व इतर साहित्य चोरून नेले. या प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपास जलदगतीने करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

या तपासासाठी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रामचंद्र शिखरे, सफौ सुनील पाटील, पोहेकॉं संतोष खवले, उमेश भांडारकर, सतिष पाटील, भास्कर ठाकरे, किशोर निकुंभ, योगेश पाटील, अमोल ठाकूर, राहुल पांचाळ व प्रणय पवार यांच्या विशेष पथकाने काम सुरू केले.

घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी समीर युसूफ शेख (वय १९, रा. पिंप्राळा हुडको) व अबरार उर्फ चिरक्या हमीद खाटीक (वय २०, रा. उमर कॉलनी) या दोन संशयितांना अटक केली. त्यांच्या साथीदार अनिल उर्फ मारी भगवान सोनवणे (वय १९, रा. पिंप्राळा हुडको) याचा पोलिस शोध घेत आहेत.

अटक करण्यात आलेल्या संशयितांपैकी अबरार खाटीक याच्यावर यापूर्वी रामानंदनगर पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. तर पसार असलेला अनिल सोनवणे याच्यावर घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, फरार आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.