गारखेडा येथे खासगी ट्रॅव्हल्स बस उलटली; अनेक प्रवासी जखमी, पोलिसांकडून माहिती लपवण्याचा आरोप

जामनेर, (प्रतिनिधी):
भुसावळहून पुण्याकडे निघालेली खासगी ट्रॅव्हल्स बस (क्रमांक MH-19-CY-2224) रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास जामनेर तालुक्यातील गारखेडा गावाजवळ रस्त्याच्या कडेला उलटल्याची घटना घडली. या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून, काहींना गंभीर दुखापत झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
अपघाताची कारणमीमांसा:
गारखेडा परिसरात सध्या रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. याच ठिकाणी बसचा ताबा सुटल्यामुळे ती रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, बसचा वेग अधिक होता व रस्ता अपूर्ण अवस्थेत असल्याने चालकाचा ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली.
घटनेनंतर जामनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असली तरी, अधिकृतरीत्या कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही. जामनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. कासार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अपघाताबाबत माहिती नसल्याचे सांगितले. काही पोलीस कर्मचाऱ्यांनी हा किरकोळ अपघात असल्याचा दावा केला. मात्र, प्रत्यक्षदर्शी व स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, या घटनेत काही प्रवासी गंभीर जखमी झाले असून पोलिसांकडून या घटनेची तीव्रता लपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे.