Cloudburst-like rain: 20 villages in Pachora taluka witness heavy rain पाचोरा (17 सप्टेंबर 2025) : पावसाने जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यातच अजिंठा डोंगर रांगेत सलग दुसर्या दिवशीही ढगफुटी सदृश्य पाऊस झाला.त्यामुळे नद्यांना आलेल्या पुरामुळे तालुक्यातील 20 गावात पावसाने हाहाकार माजवला. रात्री 12 वाजेपासून होत असलेल्या मुसळधार झालेल्या पावसामुळे हिवरा, बहुळा, अग्नावती, उतावळी नद्यांना पूर आला असून या नद्यांचे पाणी थेट बहुळा हिवरा प्रकल्पात जात असल्याने बहुळा प्रकल्पाचे नऊ दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आले.

हिवरा धरणातून पाण्याचा विसर्ग
हिवरा धरणातून 10 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पिंपळगाव हरेश्वर येथील घोडसगाव हे मातीचे धरणाला 14 ठिकाणी गळती लागल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. दरम्यान, शिंदाडसह परिसरात तब्बल 283 जनावरे, हजारो कोंबड्या दगावल्या.
इंद्रायणी नदीवरील पुलच वाहून गेल्याने काही गावांचा संपर्कही तुटला होता. सोमवारी रात्री अचानक शिंदाड नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गोठ्यातील गुरे वाहून गेले तर काही जागेवरच दगावली.