वडीगोद्री, जालना (19 सप्टेंबर 2025) : आमच्या काही लोकांच्या आणि ओबीसीतील काही जणांच्या माध्यमातून आम्हाला एकटे पाडण्याचा, गैरसमज पसरवण्याचा आणि राजकीय डाव रचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

हैदराबाद गॅझेट निर्णयाविरोधात रिट याचिका दाखल करण्याच्या भुजबळांच्या आवाहनावर बोलताना जरांगे पाटील यांनी तीव्र शब्दांत टीका केली. ते म्हणाले, त्याचं जाऊ द्या तिकडं. तो येवल्यावाला नासका माणूस आहे, त्याला कोणाचं कल्याण व्हावं, असं कधीच वाटलं नाही. भुजबळांना उद्देशून ते पुढे म्हणाले, हा ओबीसी आणि मराठ्यांमध्ये दंगली लावून मोकळा होईल.
अंतरावली सराटीतील लाठीचार्जबाबत भुजबळांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना जरांगे म्हणाले, तो जनताविरोधी, ओबीसीविरोधी आणि मराठाविरोधी आहे. सरकारने चौकशी केली, त्याला काय माहिती आहे? त्याचे आता आत जायचे दिवस जवळ आले आहेत.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी गरीब मराठा आणि गरीब ओबीसी समाजाला संयम राखण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, तुमच्यावर जर हल्ला झाला, तर मराठ्यांनी असंच म्हणायचं का? आम्ही कधी कोणत्याही जातीच्या आई-बहिणीबद्दल बोलत नाही, आम्ही सहानुभूती ठेवतो. असली पैदास जन्मालाच येऊ नये. त्याचे आई-बाबा जिवंत असतील तर थुकत असतील आणि नसतील तर नक्कीच शाप देत असतील.