कामायनी एक्स्प्रेसमध्ये लूट : चौकडी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Four and a half lakhs of goods from a Burhanpur businessman were looted in the Kamayani Express: Jalgaon Crime Branch arrests the gang जळगाव (19 सप्टेंबर 2025) : बर्‍हाणपूरच्या व्यापार्‍यावर कामायनी एक्स्प्रेसमध्ये हल्ला करीत चौकडीने साडेचार लाखांची रोकड पळवली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास सुरू असतानाच जळगावात आरोपी आल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने आरोपींच्या मुसक्या बांधल्या व रोकडही जप्त केली. आरोपींना भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

काय घडले प्रवाशासेाबत
मंगळवार, 9 रोजी बर्‍हाणपूर-जळगाव मार्गावरील कामायनी एक्सप्रेसमध्ये प्रवासी सुधाकर धनलाल पटेल (60, रा. बर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) यांच्यावर चार आरोपींनी हल्ला करून त्यांच्या पैशांची बॅग हिसकावली. त्यानंतर आरोपी रावेर स्टेशनवर उतरून पसार झाले.

गुरुवा, 18 रोजी जी.एस. ग्राऊंड परिसरात काही संशयित आल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिल्यानंतर संशयीताना पकडण्यात आले व त्यांच्याजवळील पिशवीत साडेचार लाख रुपये आढळले. पोलिस चौकशीत संशयित आरोपींनी रेल्वेत दरोडा टाकल्याची कबुली दिली.

या आरोपींना अटक
अटकेतील आरोपींमध्ये किरण पंडीत हिवरे (32, रा.भात्तखेडा, ता.रावेर), अजय सुपडू कोचुरे (25, रा.खिर्डी, ता.रावेर), हरीष अनिल रायपुरे (25, रा.प्रतापपुरा, बर्‍हाणपूर, म.प्र.), गोकुळ श्रावण भालेराव (27, रा.डांभूर्णी, ता.यावल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात सोपान गोरे, प्रीतम पाटील, यशवंत टहाफळे, बबन पाटील, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे, मयुर निकम यांचा सहभाग होता. तांत्रिक मदत गौरव पाटील व मिलिंद जाधव यांच्या पथकाने केली.