ही बातमी लाडक्या बहिणींसाठी ; ई केवायसी न केल्यास लाभ होणार बंद

‘E-KYC’ is now mandatory for beloved sisters to get benefits ; but ‘error’ on the portal मुंबई (19 सप्टेंबर 2025) : लाडक्या बहिणींसाठी ही बातमी खास महत्त्वाची आहे. यापुढे लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई केवायसी बंधनकारक करण्यात आली असून त्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे मात्र प्रत्यक्षात ही प्रक्रिया करताना ईरर येत असल्याने लाडक्या बहिणींची मोठी दमछाक होत आहे.

मंत्र्यांनी दिली ट्टीटद्वारे माहिती
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. त्यांनी ई-केवायसीची माहिती देताना सांगितले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in  या वेब पोर्टलवर ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महिला व बालविकास विभागाने काढले परिपत्रक
महिला व बालविकास विभागाने यासंबंधीचे एक परिपत्रकही काढले आहे. आधार कायद्यातील तरतुदींनुसार या योजनेच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे त्यामुळे आता विभागामार्फत ई-केवायसीच्या माध्यमातून लाभार्थ्यांची पडताळणी व प्रमाणीकरण केले जाणार आहे. लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आहे. त्यामुळे या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते.

अशी होईल केवायसी
ई केवायसी करण्यासाठी महिलांना  https://ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलवर जावे लागेल.

वरील पोर्टलवर गेल्यानंतर महिलांना प्रथम आपला आधार क्रमांक टाकावा लागेल.

आधार क्रमांकानंतर खाली दिलेला कॅप्चा टाकावा. त्यानंतर खालील सूचना वाचून ओके बटनावर क्लिक करावे.

त्यानंतर आधारवरून आलेला 6 अंकी कोड प्रविष्ट करावा लागेल.
हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर महिलांना त्यांच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकावा लागेल.

आधार क्रमांकानंतर खाली दिलेला कॅप्चा टाकावा. त्यानंतर खालील सूचना वाचून ओकेच्या बटनावर क्लिक करावे.

त्यानंतर आधारवरून आलेला 6 अंकी कोड प्रविष्ट करावा.

अखेरच्या टप्प्यात कुटुंब प्रमुखाला 1) माझ्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीस नाही किंवा निवृत्ती वेतनाचा लाभ घेत नाही, 2) माझ्या कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे या प्रश्नांची होय किंवा नाही अशा स्वरुपात उत्तरे द्यावी लागतील. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करावे. अशा प्रकारे तुमची ई-केवायसी पूर्ण होईल.

पोर्टलवर येतोय एरर
लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसीची घोषणा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केली. त्यानंतर अनेक लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करण्याचे प्रयत्न केले. मात्र, संबंधित पोर्टलवर एरर येत असल्याने लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.