Action taken against illegal call center in Egatpuri that was defrauding borrowers: Cash worth Rs 24 lakh seized नाशिक (19 सप्टेंबर 2025) : ईगतपुरीत सुरू असलेल्या अवैध कॉल सेंटरवर कारवाई करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली. कारवाईत 24 लाखांची रोकड, संगणक, लॅपटॉप, मोबाईन जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या माहितीनुसार, मीनाताई ठाकरे संकुलातील अवैध कॉल सेंटरवर बुधवारी छापा टाकण्यात आला. 40 ते 50 कर्मचारी कॉलर्स म्हणून तर काही संगणकावर काम करताना आढळले. नरेंद्र शशिकांत भोंडवे (रा. महात्मा गांधीनगर, इगतपुरी) व पारस संजय भिसे (रा. रमाबाई कॉलनी, घाटकोपर) यांना अटक करण्यात आली. दोघांना 19 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
काही बँका, वित्तीय संस्था प्रतिनिधींनी या अवैध कॉल सेंटरला कर्जदारांचा डेटा दिल्याचा संशय आहे. बँक अधिकारी भासवून कॉल सेंटरवरून कर्जदारांशी संपर्क साधला जायचा. ‘तुमचा हप्ता तत्काळ भरा, अन्यथा कारवाई होईल’, असे सांगत होते. ग्राहकाने काही विचारणा केल्यास शिवीगाळ तसेच जिवे मारण्याची धमकीही देत होते. कर्जदारांचे नातलग, जामीनदारांनाही फोन करून कर्जाचा हप्ता न भरल्यावरून धमकावले जात होते. जप्त लॅपटॉप, मोबाइल व संगणकातील डेटा तपासला जात असून संशयित संस्था व बँकेचे अधिकारीही पोलिसांच्या रडारवर आहेत.