Salon owner kills elderly man for gold मुंबई (19 सप्टेंबर 2025) :सोन्याचे भाव गगनाला भिडल्यानंतर सर्वसामान्यांना सोने खरेदी करणे आवाक्याबाहेर ठरत आहे तर याच सोन्याच्या लालसेपायी वयोवृद्धाची मुंबईत सलून व्यावसायीकाने गळा आवळून हत्या केली. वृद्ध बेपत्ता झाल्यानंतर त्याचा तपास सुरू असताना सीसीटीव्हीत तो सलूनमध्ये जाताना दिसल्याने हा प्रकार मुंबईतील मीरा भाईंदरमध्ये उघडकीस आला. विठ्ठल तांबे (76) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

काय घडले वृद्धासोबत ?
तांबे हे मंगळवार, 16 सप्टेंबर रोजी बेपत्ता झाले व याच तारखेला तांबे नेहमीप्रमाणे घराबाहेर गेले होते. परंतु, बराच वेळ झाला तरी ते परत आले नाही तसेच त्यांच्याशी संपर्क देखील साधता आला नसल्याने कुटुंबीयांनी तातडीने काशिमीरा पोलिस ठाणे गाठले व विठ्ठल तांबे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
तांबे कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी 17 व 18 सप्टेंबर रोजी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. या तपासात विठ्ठल तांबे हे एका सलूनमध्ये जाताना दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी त्या सलूनचे सीसीटीव्ही फुटेज मिळवून त्याची तपासणी केली. यात धक्कादायक बाब समोर आली.
सलूनच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले की येथील सलून मालकानेच विठ्ठल तांबे यांची गळा आवळून निर्दयीपणे हत्या केल्याचे दिसून आले. विठ्ठल तांबे यांची हत्या करून आरोपीने तांबे यांच्या गळ्यात असलेले सोन्याचे दागिने चोरले. त्यानंतर आरोपीने मृतदेह सलूनच्या आतील भागातून ओढत नेत असल्याचे देखील फुटेजमध्ये दिसून आले.
मृतदेहाचा कुठलाही ठावठिकाणा लागू नये म्हणून आरोपीने विठ्ठल तांबे यांचा मृतदेह ओढत नेला आणि जवळच्या ड्रेनेजमध्ये फेकून दिला. संपूर्ण घटनेची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सलून चालकाला अटक केली. आता पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तसेच यापूर्वी देखील या आरोपीने अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास केला जात आहे. दरम्यान, या घटनेने मीरा भाईंदर परिसरात एकच खळबळ उडाली.