आक्रमकपणा दाखवताना भान राखण्याची गरज ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांना सुनावले

The Chief Minister clearly said ; There is no support for Gopichand Padalkar’s statement! मुंबई (19 सप्टेंबर 2025) : गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानाचे आम्ही केव्हाच समर्थन करणार नाहीत, अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या एका वादग्रस्त विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणी पडळकरांच्या विधानाचा निषेध केला आहे.

कुटूंबाविषयी केले वादग्रस्त विधान
गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत एकेठिकाणी बोलताना जयंत पाटील व त्यांच्या कुटुंबीयांविषयी वादग्रस्त विधान केले होते. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पत्रकारांनी शुक्रवारी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, गोपीचंद पडळकर यांनी जे स्टेटमेंट केले ते योग्य आहे, असे माझे मत नाही. कुणाच्याही वडिलांविषयी किंवा परिवाराविषयी असे बोलणे योग्य नाही. यासंदर्भात माझी पडळकरांशी चर्चा झाली. त्यांनाही मी सांगितले. मला शरद पवारांचाही फोन आला होता. त्यांच्याशीही मी संवाद साधला. अशा प्रकारच्या विधानाचे आम्ही कधीच समर्थन करणार नाही.

बोलताना भान राखण्याचा सल्ला
गोपीचंद पडळकर एक तरुण नेते आहेत. आक्रमक नेते आहेत. अनेकदा आक्रमकपणा दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत त्यामुळे मी त्यांना सांगितले आहे की, हे लक्षात घेऊनच आपला आक्रमकपणा राखला पाहिजे. तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे. त्यामुळे आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील हे लक्षात घेऊन आपण बोलले पाहिजे, असा सल्ला मी त्यांना दिला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

काय आहे वादग्रस्त विधान ?
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील व त्यांच्या कुटुंबाविषयी एक वादग्रस्त विधान केले आहे. जयंत पाटील हा एक बिनडोक माणूस आहे. तो दर आठ दिवसांनी आपण किती बिनडोक आहोत हे सिद्ध करतो. एका कंत्राटदाराच्या आत्महत्येच्या प्रकरणात ते मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी जतमध्ये काही माणसे पाठवली होती. त्यांच्या मार्फत त्यांनी मी एखाद्या व्यापार्‍याकडून पैसे घेतलेत का? याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण हा गोपीचंद पडळकर जयंत पाटलांसारखा भिकार्‍याची अवलाद नाही. हा जयंत पाटील राजराम बापू पाटील यांची अवलाद नक्की नसणार ! काहीतरी गडबड आहे, असे ते म्हणाले होते.

शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे नोंदवला निषेध
गोपीचंद पडळकर यांच्या या विधानानंतर शरद पवारांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन करून पडळकर यांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला. अशा प्रकारची पातळी सोडून केलेली टीका योग्य नाही. या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. बेताल वक्तव्य करणार्‍यांना आवरा, असे ते फडणवीसांना म्हणाले.