नाशिकमध्ये प्रियकराकडून प्रेयसीच्या नवर्‍याच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

Wife’s first love is a young man’s lover : Vigilance foils kidnapping plot नाशिक (19 सप्टेंबर 2025): लग्नापूर्वी विवाहितेचे प्रेमसंबंध असल्याने लग्नानंतरही प्रियकर पिच्छा सोडत नसल्याने त्याने चक्क विवाहितेच्या नवर्‍यालाच किडनॅप करण्याचा प्रयत्न केला व त्यासाठी मित्रही सोबतीला धावून आले मात्र तरुणाच्या सतर्कतेने हा प्रयत्न फसला व संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा व्हिडिेओ देखील समोर आला आहे.

काय घडले नाशिकमध्ये ?
नाशिकच्या सातपूर पपया नर्सरी परिसरात बुधवारी दुपारी ही अपहरणाची घटना घडली. तेजस ज्ञानदेव घाडगे (24) असे पीडित तरुणाचे नाव आहे. तो आपल्या पत्नीसह नाशिकच्या सिडको परिसरात राहतो. त्याचे गत 24 मे रोजी एका तरुणीशी लग्न झाले. त्या तरुणीचे लग्नापूर्वी गिरीश शिंगोटे नामक तरुणाशी प्रेमसंबंध होते. पण अचानक तिचे लग्न तेजसशी झाले त्यामुळे गिरीश हा सातत्याने तेजसला ठार मारण्याची धमकी देत होता. बुधवार, 17 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास तेजस आपल्या एका मित्राला भेटण्यासाठी त्र्यंबक रोडवरील एका चहाच्या टपरीवर गेला होता.

तिथे गिरीश, त्याचा मित्र व त्याच्या वडिलांसोबत नास्त्याचे हॉटेल टाकण्याची चर्चा करत होते. तेव्हा गिरीश शिंगोटे तिथे आपल्या मित्रांसोबत येऊन धडकला. त्यांच्यासोबत एक पांढर्‍या रंगाची स्विफ्ट डिझायर कार होती. त्यांनी तेजसला टपरीतून ओढत बाहेर नेले आणि बळजबरीने कारमध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी गाडी तशीच सातपूर कॉलनी परिसरात नेली. त्यानंतर त्यांनी कार पुन्हा त्र्यंबक रोड परिसरातून जात असताना तेजसने शिव हॉस्पिटलगत कारमधून उडी मारली. त्यानंतर त्यातच स्थितीत जिवाच्या आकांताने ऑटो पकडून पपया नर्सरी येथील ट्रॅफिक पोलिस चौकी गाठली.

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल
तेजस पोलिस चौकीत पोहोचल्याचे पाहताच आरोपींनी तेथून पळ काढला. त्यानंतर त्याने आपल्यावरील बेतलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. त्यानुसार सातपूर पोलिस ठाण्यात अपहरण व जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडे, या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात आरोपी पीडित तरुणाला जबरदस्तीने कारमध्ये कोंबण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ कारपासून काही अंतरावर उभ्या असणार्‍या एका दुचाकीवरील तरुणांनी चित्रित केल्याचे दिसते. विशेष म्हणजे आरोपींच्या भीतीपोटी हे तरुणही घाबरल्याचे दिसून येत आहे.