Petitions in Nagpur and Aurangabad disposed of : Zilla Parishad elections will be held first ! मुंबई (20 सप्टेंबर 2025) : जिल्हा परिषदांची गट रचना व आरक्षण ठरविण्याच्या पद्धतीला आव्हान देणार्या याचिका मुंबई न्यायालयाच्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी फेटाळल्याने सर्वात आधी आता जिल्हा परिषद व नंतर पंचायत समितीच्या निवडणुका होतील हे स्पष्ट आहे.

उच्च न्यायालयातील याचिका फेटाळल्या
उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने जिल्हा परिषदांच्या निवडणूक घेण्यात आयोगाला अडचणी येत होत्या मात्र कोर्टाच्या निकालाने त्या दूर झाल्या. आता फक्त कोल्हापूर सर्किट बेंचमधील याचिका शिल्लक असून त्याचा निकाल लवकरच येणार असून या निवडणुकीचा मार्ग प्रशस्त होईल, असे मानले जात आहे. त्यामुळे दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांनी घेतली बैठक
राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी शुक्रवारी राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांची व्हिडिओ कॉन्फ्रन्सद्वारे बैठक घेतली. मतदान केंद्रे, ईव्हीएमची उपलब्धता आणि आचारसंहिता काळातील कायदा व सुव्यवस्था याविषयी चर्चा करण्यात आली. आयोगाचे सचिव सुरेश काकांनी यावेळी उपस्थित होते.
औरंगाबाद खंडपीठाने फेटाळल्या 33 याचिका
गण व गटाच्या अंतिम प्रभाग रचनेबाबत विविध मुद्यांवर आक्षेप घेणार्या 33 याचिका औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी फेटाळल्या. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नांदेड, बीड, हिंगोली आदी गण व गट’ प्रभाग रचनेबाबत विविध आक्षेप घेण्यात आले होते.
नागपूरात फेटाळल्या याचिका
जिल्हा परिषदांचे सर्कल आरक्षित करण्यासाठी आगामी निवडणुकीपासून नवीन रोटेशन राबविण्याच्या निर्णयाला आव्हान देणार्या चारही याचिका नागपूर खंडपीठाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळल्या.